कर्जत: बांधून तयार आणि उद्घाटनही झालेले कर्जत बस आगार तत्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व मित्र पक्षांनी लाक्षणिक उपोषण केले. याची दखल घेत २० सप्टेंबरपर्यंत कर्जत आगार सुरू करण्याचे तसेच १० सप्टेंबरपर्यंत १० एसटी बस सुरू करण्याचे आश्वासन एसटी महामंडळाच्या विभागीय नियंत्रकांनी दिले.
कर्जतच्या बस आगाराचा प्रश्न अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय ठरला आहे. विधानसभेच्या अनेक निवडणुका या प्रश्नावर लढवल्या गेल्या, परंतु विषय मार्गी लागला नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमदार रोहित पवार यांनी आगाराला मंजुरी मिळवली. तत्कालीन परिवहनमंत्री अनिल परब यांच्या हस्ते उद्घाटनही झाले. त्याला दोन वर्षे लोटली, तरीही आगार सुरु झाले नाही. त्यामुळे आगार सुरु करण्यासाठी पुन्हा आंदोलन करण्याची वेळ स्थानिकांवर आली. आगार सुरु होत नसल्याने नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी, वृद्ध या सर्वच प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. या भागात सद्गुरु संतश्री गोदड महाराज, सिद्धटेक गणपती, राशीनची जगदंबा माता अशी अनेक धार्मिक स्थळे आहेत. त्यामुळे राज्यभरातून भाविक कर्जतला येत असतात. त्यांची मोठी गैरसोय होते.
विभागीय नियंत्रकांनी उपोषणस्थळी भेट देऊन सुरु करण्यासाठी लागणारी कार्यवाही २० सप्टेंबरपर्यंत करण्याचे, तसेच १० सप्टेंबरपर्यंत १० बस एसटी बस सुरु करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. पक्षाचे पदाधिकारी रघु (आबा) काळदाते, बळीराम यादव, डॉ. चंद्रकांत कोरडे, अनिल पांडुळे, गुलाब तनपुरे, किरण पाटील, पोपट खोसे, बाळासाहेब साळुंखे, पूजा सूर्यवंशी, प्रीती जेवरे, सचिन सोनमळी, बाळासाहेब सपकाळ, शाहूराजे भोसले, राम कानगुडे, माऊली सायकर आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
कर्जतकरांचा विजय
आश्वासनाप्रमाणे कर्जतचे एसटी आगार मंजूर करुन दाखवले, त्याचे उद्घाटनही केले. परंतु केवळ या कामाचे श्रेय मिळू नये म्हणून राजकीय द्वेषातून आगार सुरु केले जात नव्हते. अखेर जनमताच्या रेट्यामुळे २० सप्टेंबरपर्यंत कार्यवाहीचे आश्वासन प्रशासनाने दिले. हा राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाचे पदाधिकारी व कर्जतकरांचा विजय असल्याचे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.