Sushil Kedia Challenged Raj Thackeray: गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्र मराठी विरुद्ध हिंदी असा भाषिक वाद पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा आधार घेऊन राज्य सरकारने पहिलीपासून मराठी भाषा शिकण्यासंदर्भात आदेश जारी केला. पण या निर्णयाला सामाजिक व राजकीय वर्तुळातून झालेला विरोध लक्षात घेता महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू व्हायच्या आदल्या दिवशीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यासंदर्भातले अध्यादेश रद्द केल्याचं जाहीर केलं. या पार्श्वभूमीवर मराठी भाषेचा विषय चर्चेत असतानाच मुंबईतील एका व्यावसायिकानं थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाच आव्हान दिलं आहे.
आर्थिक बाबींवर मार्गदर्शनपर सल्ले देणारे व्यावसायिक सुशील केडिया यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट व्हायरल होत आहे. मुंबईसह महाराष्ट्रात मराठी बोलली गेली पाहिजे, असा आग्रह मनसेकडून केला जात आहे. यासंदर्भात काही ठिकाणी उद्भवलेल्या स्थानिक वादांमध्येही मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ही बाब वारंवार स्पष्ट केली आहे. प्रसंगी काही ठिकाणी मारहाणीच्याही घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सुशील केडियांनी केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
काय आहे सुशील केडिया यांची पोस्ट?
सुशील केडियांनी केलेल्या पोस्टमध्ये राज ठाकरेंच्या मराठी भाषेच्या आग्रहावर टीका करण्यात आली असून आपण मराठी शिकणार नाही, अशी भूमिकाच सुशील केडिया यांनी जाहीर केली आहे. “राज ठाकरे, याची नोंद घ्या की मी मुंबईत गेल्या ३० वर्षांपासून राहतो. पण मला मराठी व्यवस्थित येत नाही. आता तुमचं यासंदर्भातलं बेफाम गैरवर्तन पाहता मी हा पणच केला आहे की जोपर्यंत तुमच्यासारखे लोक मराठी माणसाचे कैवारी म्हणून वावरत आहेत, तोपर्यंत मी मराठी शिकणा नाही, काय करायचंय बोल”, असं केडियांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मराठीच्या नावाखाली हलक्या दर्जाचे राजकारण – सुशील केडिया
दरम्यान, या पोस्टवर नेटिझन्सकडून सुशील केडियांना लक्ष्य केलं जात असताना त्यावरदेखील त्यांनी प्रतिक्रिया देताना राज ठाकरेंवर टीका केली आहे. “मराठी भाषा न शिकणे हा त्यांचा अपमान नाही. पण मराठीच्या नावाखाली हलक्या दर्जाचे राजकारण आणि गुंडगिरी करणे हा त्यांचा अपमान आहे हे निश्चित”, अशी पोस्ट सुशील केडियांनी केली आहे.
“गप्प बसा आणि गुंडगिरीचं समर्थन करणं थांबवा”
दरम्यान, मनसेशी संबंधित एका युजरने सुशील केडियांच्या पोस्टवर कमेंट करताना मुंबईत परप्रांतीय व्यक्तीला मराठीचा अवमान केल्याच्या आरोपाचा संदर्भ देत हिंदीभाषिकांच्या बोलण्याच्या अॅटिट्युडवर भाष्य केलं. “इथे अॅटिट्युडची समस्या आहे. त्या व्यक्तीने मराठीबद्दल अपशब्द उच्चारले म्हणून त्याला मारहाण झाली. असे अनेक लोक आहेत जे प्रामाणिकपणे आणि नम्रपणे सांगतात की आम्हाला मराठी येत नाही, तुम्ही हिंदीत बोलाल का? अशा लोकांना कुणीही मारत नाही”, असं या युजरने पोस्टमध्ये म्हटलं.
यावर सुशील केडियांनी या युजरलाच सुनावलं. “गप्प बसा आणि गुंडगिरीचं समर्थन करणं थांबवा. सगळेच शांत आणि नम्रपणे बोलतात की आम्हाला मदतीची गरज आहे, तुम्ही अमुक अमुक भाषेत बोलाल का. ही गुंडगिरी सामान्य नागरिक करत नाहीत, अयशस्वी राजकारणीच करतात. त्यांना लोकांचं लक्ष स्वत:कडे वळवायचं असतं. त्यामुळे याचं समर्थन करू नका, गुंडगिरीसाठी माफी मागा किंवा तुरुंगात जा”, असं केडियांनी या युजरला सोशल मीडियावर सुनावलं आहे.