रत्नागिरी – गणेशोत्सवानंतर मुंबईवासी कोकणकर आता परतीच्या प्रवासाला लागले आहेत. त्यांचा प्रवास चांगला आणि सुखकर होन्यासाठी रत्नागिरी विभागाच्या वतीने जादा एसटी बसेस सोडण्यात आल्या. रत्नागिरी जिल्ह्यातून २ हजार १३९ एसटी बसेस मधून कोकणकर मुंबईला रवाना झाले आहेत. या सर्व बसेस कोकणकरांना घेवून मुंबईत सुखरुप पोहचल्याची माहिती रत्नागिरी एसटी विभागाकडून देण्यात आली आहे.

गणेशोत्सवानंतर कोकणकरांच्या परतीच्या प्रवासासाठी २ हजार १३९ एसटी बसेसचे आरक्षण फुल्ल झाले होते. दि. २ ते ७ सप्टेंबरच्या काळात टप्प्या टप्याने एसटी बसेस सोडण्यात आल्या. शेवटच्या दिवशी तब्बल ५६ एसटी बसेस मुंबईला रवाना झाल्या. चांगल्या सुविधा, नियोजनामुळे चाकरमान्यांचा मुंबई, पुण्याचा प्रवास सुखकर, चांगला झाल्याचे सांगितले जात आहे. परतीच्या प्रवासाठी जादा गाड्या सोडणाऱ्या रत्नागिरी विभागाला लाखो रुपयांचा फायदा होणार आहे. त्यातून एसटीच्या उत्पनात चांगली वाढ अपेक्षित आहे.

गणेशोत्सवासाठी प्रत्येक कोकणकर आपल्या मुळगावी जात असल्यामुळे एसटी महामंडळाच्या वतीने गणेशोत्सवासाठी ५ हजार २०० एसटी बसेस कोकणात सोडल्या होत्या. त्यापैकी २९३० एसटी बसेस रत्नागिरी जिल्हाात आल्या होत्या. रत्नागिरी विभागाच्या एकूण २०० एसटी बसेस मुंबईला गेल्या होत्या. त्यानंतर रत्नागिरी विभागाने २ हजार ५०० एसटी बसेसचे नियोजन कोकणकरांच्या परतीसाठी केले होते. त्यापैकी २,१३९ एसटी बसेसचे आरक्षण फुल्ल झाले होते. २ ते ७ सप्टेंबरच्या कालावधीत या एसटी बसेस रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच आगारातून मुंबईत सुखरुप पोहोचल्या आहेत. गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या कोकणकरांचा सुखरुप मुंबईत पोहचविण्यासाठी एसटीच्या सर्वच कर्मचा-यांनी मेहनत घेतल्याने विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी सर्वांचे कौतुक केले आहे..