सावंतवाडी : कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीतील वनक्षेत्रात सुरू असलेल्या हत्ती पकड मोहिमेला आता मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या धरपकड मोहिमेवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने राज्य शासनाला याबाबत माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ नोव्हेंबर रोजी होणार आहे.रत्नागिरी येथील सामाजिक कार्यकर्ते रोहन कांबळे यांनी ही याचिका दाखल केली आहे. ही सुनावणी अॅड. मकरंद कर्णिक आणि अॅड. शर्मिला देशमुख यांच्या कोल्हापूर खंडपीठासमोर सुरू झाली आहे.
याचिकेत कोल्हापूर-सिंधुदुर्ग वनविभागाने हत्तींची धरपकड थांबवावी, तसेच हत्तींचा मानवी वस्तीमधील वावर आणि त्यांच्या स्थलांतराबाबत योग्य ती माहिती सादर करण्याची मागणी करण्यात आली आहे.याचिकेत कोल्हापूर वनविभागातील हत्ती संरक्षण व संगोपनाचा आढावा घेण्यासाठी एक स्वतंत्र समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. या समितीत वन विभागाचे अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी, तसेच प्राणीप्रेमी व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांचा समावेश असावा, असे सुचवले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापूर्वी २००९ आणि २०१५ मध्ये राबवण्यात आलेली हत्ती पकड मोहीम पूर्णपणे अयशस्वी ठरली होती. या दोन्ही मोहिमेत प्रत्येकी दोन असे एकूण ४ हत्ती मरण पावले होते. हत्ती पकडण्याची प्रक्रिया नियमानुसार झाली नसल्याचे याचिकाकर्त्यांनी नमूद केले असून, न्यायालयाने यावर ताशेरे ओढले होते.सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात ४ हत्ती आहेत, तर ओंकार हत्ती सध्या सावंतवाडी तालुक्यातील मडूरा पंचक्रोशीत आहे. हे हत्ती जंगलापासून दूर भरवस्तीत वावरत आहेत. त्यांच्याकडून शेती-बागायतीचे मोठे नुकसान सुरू आहे. त्यामुळे हत्ती पकड मोहीम राबवून त्यांना जेरबंद करावे, अशी स्थानिक लोकांची मागणी जोर धरू लागली आहे.या पार्श्वभूमीवर, ओंकार हत्तीला ३१ डिसेंबरपर्यंत पकडण्याची परवानगी प्रशासनाला मिळाली आहे आणि हत्ती पकड मोहिमेने वेग घेतला असतानाच, कोर्टात याचिका दाखल झाली आहे.
आरोग्य आणि हत्ती समस्या: सरकार दरबारी विषय लोंबकळत
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात ट्राॅमा केअर सेंटर आणि आय सी यू नसल्याने डॉक्टर व कर्मचारी पदे रिक्त असल्याने रुग्णांना उपचारासाठी गोवा, कोल्हापूर व बेळगाव येथील रुग्णालयांमध्ये रेफर करावे लागते. यासंदर्भात अभिनव फौंडेशनने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे आणि तिची सुनावणी कोल्हापूर खंडपीठात सुरू आहे. त्याचप्रमाणे, हत्तींचा प्रश्न २० वर्षांपेक्षा जास्त काळ कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागांना सतावत आहे. हत्तींमुळे शेती-बागायतीचे मोठे नुकसान होत आहे, तसेच मनुष्यहानीही झाली आहे. सरकार दरबारी हा विषय अनेक वर्षांपासून लोंबकळत राहिल्यामुळे लोकांना त्रास झाला आहे. आता हत्ती पकड मोहिमेवर उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाकडे याचिका दाखल झाल्याने या प्रश्नाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
