कोल्हापूर : राज्यातील सर्वात मोठा सहकारातील दूध संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्हा दूध संघ तथा गोकुळच्या कारभारा विरोधात कोल्हापुरातील सर्किट बेंचमध्ये गर्जना संघटनेचे अध्यक्ष प्रकाश बेलवाडे यांनी याचिका दाखल केली आहे. गोकुळ दूध संघ मध्ये गंभीर स्वरूपाचे संशयास्पद व्यवहार झाले असल्याने आणि याबाबत उच्च न्यायालयाने निर्देश देऊनही कारवाई न झाल्याने संचालक मंडळ बरखास्त करावी, अशी मागणी त्यांनी या याचिकेद्वारे न्यायालयाकडे केली आहे. याबाबतची पुढील कामकाज येत्या २६ ऑगस्ट (मंगळवारी) होणार असून याकडे लक्ष वेधले आहे. कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये पहिली याचिका गोकुळ दूध संघाच्या विरोधात दाखल झाल्याने त्याची चर्चा होत आहे.

आज मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर येथे सर्किट बेंचचे कामकाज सुरू झाले. यावेळी गर्जना संघटनेचे प्रमुख प्रकाश बेलवाडे यांनी गोकुळ (कोल्हापूर जिल्हा दुध) संघातील अनागोंदी कारभार आणि वारेमाप भ्रष्टाचारामुळे हजारो सभासद संस्था आणि दूध उत्पादकांचे आर्थिक नुकसान होऊन पर्यायाने सभासदांचा विश्वासघात झाला असल्याने उच्च न्यायालयात रीतसर खटला दाखल केला आहे . याबाबत एडवोकेट सतीश तळेकर हे प्रकाश बेलवाडे यांच्यावतीने कामकाज पाहत आहेत.

प्रकाश बेलवाडे हे वडकशिवाले येथील श्री महादेव सहकारी दूध संस्थेचे संचालक आहेत. त्यांनी पत्रकारांना सांगितले की, कोल्हापूर जिल्हा दूध संघात गोकुळ २०१११ पासून अनागोंदी कारभार आणि आर्थिक अनियमितता सुरू आहे. या विरोधात दूध विकास विभागाकडे अनेकदा तक्रारी सादर करण्यात आल्या होत्या. त्यानंतर शासकीय वर्ग एक लेखापरीक्षक बाळासाहेब मसुगडे यांच्याकडे चाचणी आणि विशेष लेखापरीक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले . त्यांनी २२ मे २०२३ मध्ये चाचणी आणि विशेष लेखापरीक्षण मधील त्रुटी आणि दुरुस्ती अहवाल सादर केला होता. सहकार कायद्यातील तरतुदीप्रमाणे लेखापरीक्षण सादर झाल्यानंतर तीन महिन्याच्या दुरुस्ती करून त्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून आर्थिक नुकसानीची वसुली करणे प्राप्त आहे. तसेच कायद्यातील तरतुदीनुसार संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त होणे अपेक्षित आहे.

शासनाचा विशेष लेखापरीक्षणात दूध संघाने विविध प्रक्रिया टाळून खरेदी करणे, वाढीव भागाने पशुखाद्य खरेदी करणे, वारेमाप जाहिरात करणे, खाजगी व्यक्तींना देणग्या देणे , मुंबईमध्ये करोडे रुपयांची जमीन खरेदी करताना रीतसर प्रक्रिया न राबवता संशयास्पद व्यवहार करणे अशा अनेक त्रुटी आढळून आल्या होत्या. यावर वार्षिक सर्वसाधारण सभेत चर्चा करून सभासदांसमोर दुरुस्ती अहवाल सादर करणे क्रमप्राप्त असताना संचालक मंडळांनी मनमानी करून अधिकाऱ्यांशी संगणमत करून कोणत्याही प्रक्रिया पार पाडलेल्या नाहीत. याबाबत उच्च न्यायालयाने २८ ऑगस्ट २०२३ च्या निकालात निर्देश दिले होते.

परंतु लेखापरीक्षकांनी, सहकार विभागाने, दुग्ध विकास आयुक्तालयाने कोणतीही कारवाई न केल्याने अखेर दूध उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी गर्जना संघटनेचे अध्यक्ष प्रकाश बेलवाडे यांनी उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर येथे पहिल्याच दिवशी याचिका दाखल केली आहे. हा लढा संचालक मंडळ बरखास्त, आर्थिक वसुली आणि संचालकांची अपात्रता होईपर्यंत सुरू राहील असे बेलवाडे यांनी सांगितले.