कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ सोमवारी गडहिंग्लज येथे मोर्चा काढण्यात आला. जमिनीचे सातबारा उतारे सोबत घेऊन शेतकरी मोर्चामध्ये उतरले होते. चंदगड तालुक्याच्या विकासासाठी शक्तिपीठ महामार्ग मुख्यमंत्र्यांनी या तालुक्याला जोडावा, अशी मागणी आमदार शिवाजी पाटील यांनी केली.
शक्तिपीठ महामार्गावरून कोल्हापुरात वातावरण तापले आहे. शक्तिपीठ महामार्गामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांची मांडणी करीत राष्ट्रीय महामार्गावर प्रकल्प रद्द करावा, या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता. तर आज आमदार शिवाजी पाटील, माजी मंत्री भरमू पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. मोर्चा प्रांत कार्यालयावर गेल्यानंतर उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे यांना निवेदन देण्यात आले.
विकासाला गती
यावेळी आमदार पाटील म्हणाले की, मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला विरोध झाला होता. पण यामुळे दळणवळण सोपे झाले असून, विदर्भ मराठवाड्याला मोठा फायदा झाला आहे. शक्तिपीठ महामार्गामुळे असाच विकास होणार असल्याने शेतकऱ्यांनी मोर्चा काढला आहे. चंदगड, गडहिंग्लज, आजरा या दक्षिणेकडील भागात पर्यटन वाढ आणि तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
शेट्टी, पाटलांवर टीकास्त्र
राजू शेट्टी यांच्या स्वभावामुळे कार्यकर्ते सोडून गेले आहेत. शक्तिपीठ महामार्गामुळे चंदगड भागाचा विकास होणार आहे, हे सतेज पाटील यांनाही माहीत आहे. त्यामुळे त्यांचे काही मनावर घेऊ नका. महामार्ग झाल्यावर ते शासनाचे अभिनंदन करतील, असा टोला आमदार पाटील यांनी लगावला.