गेल्या दोन दिवसांपासून कोकणाप्रमाणेच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातारा-सांगली या जिल्ह्यांना देखील अतीवृष्टीचा जोरदार तडाखा बसला आहे. शुक्रवारी दिवसभर मुसळधार पाऊस आणि समोर पंचगंगेची सासत्याने वाढणारी पातळी या पार्श्वभूमीवर कोल्हापूरकरांचा जीव टांगणीला लागला होता. अजूनही कोल्हापूरमध्ये महापूराचं सावट कायम असलं, तरी पावसानं ओढ घेतली असल्यामुळे कोल्हापूरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. शनिवारी सकाळी ७ वाजता पंतगंगेची पातळी देखील काहीशी खाली आली असून ५५ फुटांपर्यंत नोंद करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

४१ हजार नागरिकांचं स्थलांतर

शुक्रवारी दिवसभर कोसळणाऱ्या पावसानं रात्रभर विश्रांती घेतल्यामुळे शनिवारची सकाळ कोल्हापूरकरांसाठी काहीसा दिलासा देणारी ठरली. पावसानं उघडीप दिल्यानंतर एनडीआरएफच्या पथकांचं काम वेगाने सुरू झालं आहे. शुक्रवारी दिवसभरात एनडीआरएफच्या तीन पथकांनी मिळून सुमारे ४१ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. आज दिवसभर देखील बचावकार्य सुरूच राहणार असून जोपर्यंत सर्व नागरिक सुरक्षित स्थळी पोहोचत नाहीत, तोपर्यंत बचावकार्य थांबणार नाही, असं एनडीआरएफकडून सांगण्यात आलं आहे.

 

अलमट्टीतून ३ लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

पावसानं उघडीप दिली असली, तरी अजूनही कोल्हापूरकर महापुराच्या सावटाखाली आहेत. कोल्हापूरचं राधानगरी धरण ९३ टक्के भरलं आहे. पाऊस नसल्यामुळे पाणी काहीसं ओसरू लागलं आहे. मात्र, अजूनही ११६ बंधारे पाण्याखालीच आहेत. जिल्ह्यातल्या ३५ हून जास्त मार्गांवर पाणी साचल्यामुळे तिथून वाहतूक बंद आहे. कोल्हापूर प्रशासनानं दिलेल्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत कोल्हापुरात पावसामुळे ५ जणांचा मृत्यू झाला असून अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठी वित्तहानी झाल्याचा देखील अंदाज आहे. पाणी पूर्ण ओसरल्यानंतर नुकसानीची निश्चित आकडेवारी काढता येईल, असं प्रशासनाचं म्हणणं आहे. दरम्यान, २०१९मध्ये कोल्हापूरमध्ये महापूर येण्यास कारणीभूत ठरलेल्या अलमट्टी धरणातून ३ लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याची माहिती देखील प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Raigad landslide : ४४ मृतदेह काढले बाहेर; ५० पेक्षा जास्त माणसं अजूनही ढिगाऱ्याखालीच?

एनडीआरएफसोबतच लष्करही मदतीला

कोल्हापूरमधील संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता शहरात लष्कराचं पथक देखील दाखल झालं असून बचावकार्य वेगाने सुरू आहे. अजूनही अर्ध शहर पाण्याच्या विळख्यात असलं, तरी मोठ्या संख्येनं नागरिक सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू आहे. नुकसानीचा अंदाज घेता, हजारो एकर शेतीचं नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे. अनेक वाहनं वाहून गेली असल्याचं दृष्यांमधून दिसून येत आहे.

महाराष्ट्रावर पावसाचं संकट! काय आहे राज्य सरकारचा प्लॅन ऑफ अ‍ॅक्शन? जाणून घ्या!…

शनिवारी राजाराम बंधाऱ्यावरील कमी होत जाणारी पाणीपातळी

सकाळी 06.00 वाजता
राजाराम बंधारा पाणी पातळी
56’00”
547.26 मीटर
विसर्ग 75991 क्युसेक्स आहे.
एकूण पाण्याखालील बंधारे -: 116

सकाळी 07.00 वाजता
राजाराम बंधारा पाणी पातळी
55’10”
547.21 मीटर
विसर्ग 75733 क्युसेक्स आहे.
एकूण पाण्याखालील बंधारे -: 116

सकाळी 08.00 वाजता
राजाराम बंधारा पाणी पातळी
55’8″
547.15 मीटर
विसर्ग 75478 क्युसेक्स आहे.
एकुण पाण्याखालील बंधारे -: 110

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur rain update ndrf teams rescue operation water level in panchganga river pmw
First published on: 24-07-2021 at 10:00 IST