वाढत्या महागाईतून जनतेला दिलासा मिळताना दिसत नाही आहे. दिवाळी सण तोंडावर आलेला असताना अमूलने फुल क्रिम दुधासह म्हशीच्या दूधात दरवाढ केली होती. त्यात आता राज्य सहकारी गोकुळने म्हशीच्या दूध दरात वाढ केली आहे. शुक्रवारपासून ही दरवाढ लागू होणार आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, गोकुळकडून म्हशीच्या दूध विक्री दरात ३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही दूध दरवाढ मुंबई आणि पुणे शहराकरता लागू असेल. त्यामुळे मुंबई आणि पुण्यात एक लिटर दुधाची किंमत ६६ रुपयांवरून ६९ रुपये झाली आहे. तर, अर्धा लिटर दुधाची किंमत ३३ रुपयांवरून ३५ रुपये झाली आहे. यापूर्वी दीड वर्षांत गोकुळने सहा वेळा दूध दरात वाढ केली आहे.

हेही वाचा : “संजय राऊतांना भीती वाटायला लागलीय की अंधारेताई…”; सुषमा अंधारेंवरुन शिंदे गटाचा टोला

याबाबत बोलताना गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील म्हणाले की, “रशिया-युक्रेन संघर्ष आणि अनेक दूध उत्पादक देशात दुष्काळ पडला आहे. त्यामुळे दुधाचे उत्पादन घटलं असून, दूध पावडरची मागणी वाढली आहे. मात्र, सध्या दूध संकलन कमी असल्याने पावडरची मागणी पुरवू शकत नाही. दूध संकलन वाढवण्यासाठी खरेदी दरात वाढ करण्यात आली आहे. त्याचा परिणाम म्हणून दूध विक्री दरात वाढ करण्यात आली आहे,” असेही पाटील यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा : “मंत्रीपदाचे काय करता? मी स्वत: ला मुख्यमंत्री समजतो”; शिंदे गटातील आमदाराचं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन दिवसांपूर्वी अमूलने केली होती दरवाढ

अमूल दूधने फुल क्रीमसह म्हशीच्या दुधात लिटरमागे २ रुपयांची वाढ केली आहे. या दरवाढीमुळे फुल क्रीम दुधाची किंमत लिटरमागे ६१ रुपयांवरून ६३ रुपये होणार आहे. गायीचे दूध आता ५३ रुपये प्रतिलिटरपासून ५५ रुपये प्रतिलिटर होणार आहे. यासह गोल्ड, म्हशीच्या दूध दरातही लीटरमागे २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ गुजरात वगळता देशातील सर्वच राज्यांत लागू असेल.