रत्नागिरी – कोकण रेल्वेने गणेशोत्स्व कालावधीत कोकणात येणा-या चाकरमान्यांची संख्या बघता या मार्गावर इतर गाड्यां व्यतिरीक्त मेमू गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या गाड्यांची प्रवाशी क्षमता खुपच कमी असते. तसेच या गाड्यांचा फायदा मोजक्याच ठिकाणच्या लोकांना होणार असल्याने या मेमू गाड्यां बाबत कोकण वासियां कडून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
कोकणात जाण्यासाठी गणेशोत्सव कालावधीत मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या दिवा-चिपळूण (०११५५/०११५६) आणि दिवा-खेड (०११३३/०११३४) अशा दोन ८ डब्यांच्या मेमू गाड्यां सोडण्यात येणार आहेत. मात्र कोकणातील प्रवाशांनी या गाड्यां बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या गाड्या मर्यादित प्रवाशांनाच लाभदायक ठरणार असल्याने, कोकण विकास समितीकडून या गाड्या रद्द करून पारंपरिक २४ डब्यांच्या लोको-हॉल्ड गाड्या दादर, एलटीटी, वांद्रे किंवा बोरिवलीहून सुरू करण्याची मागणी केली आहे.
समितीने असे म्हटले आहे की, मुंबईतील गिरगाव, लालबाग, परळ, दादर, माहिम, अंधेरी, सांताक्रुज, बोरिवली, भाईंदर, वसई, ठाणे आणि घाटकोपर परिसरात राहणाऱ्या लाखो चाकरमान्यांना दिवा किंवा पनवेलला पोहोचणे कठीण जात आहे. त्यामुळे घोषीत मेमू गाड्यांचा प्रत्यक्ष फायदा फार थोड्याच प्रवाशांना मिळणार आहे.
गणेशोत्सवात कोकणात जाणा-या सर्वच गाड्यांना गर्दी मोठ्या प्रमाणावर होत असते. त्यामुळे केवळ ८ डब्यांच्या मेमू गाड्या पुरेशा ठरणार नाहीत, असा समितीने ठाम सांगितले आहे. मेमू रेकमध्ये मोटर कोचमुळे प्रवासी क्षमता मर्यादित होते आणि प्रवाशांना वर बसण्याचीही सुविधा नसते. त्यांच्या मते, मेमूची क्षमता पारंपरिक गाड्यांच्या तुलनेत सुमारे ४० टक्क्यांनी कमी असते. संपूर्ण अनारक्षित असलेल्या या गाड्यांमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी जागा मिळेल याची हमी नसते. परिणामी, सुरुवातीच्या स्थानकांवरील गर्दीमुळे पुढील स्थानकांवरील प्रवाशांना जागा मिळत नाही. त्यामुळे जरी गाड्यांची संख्या वाढवली गेली असली, तरी प्रत्यक्षात त्याचा फायदा पूर्ण क्षमतेने मिळत नाही.
कोकण विकास समितीच्या प्रमुख मागण्या गाड्यांचे जाण्याचे ठिकाण बदलणे, या गाड्या दिवा किंवा पनवेलऐवजी दादर, एलटीटी, वांद्रे किंवा बोरिवली येथून सुरू कराव्यात अशी मागणी समितीने केली आहे. मेमूऐवजी २४ डब्यांचा लोको-हॉल्ड रेक वापरावा. त्यात आरक्षित द्वितीय श्रेणी डबे, एसी चेअर कार डबे व अनारक्षित डबे असावेत. या बदलांमुळे कोकणातील प्रवाशांना गणेशोत्सवात सोयीस्कर सेवा मिळेल. शिवाय रेल्वेचे उत्पन्नही वाढेल, असा विश्वास समितीने व्यक्त केला आहे.
या समितीच्या मागण्यांवर रेल्वे प्रशासन काय निर्णय घेते याकडे आता चाकरमानी लोकांचे लक्ष लागुन राहिले आहे.