रत्नागिरी : मुसळधार पावसाने  रत्नागिरी जिल्ह्याला अक्षरश: झोडपून काढले असून खेड आणि चिपळूण शहराला पुराचा फटका बसला आहे. जिल्ह्यातील ८ पैकी ४ प्रमुख नद्यांचे पाणी शहरातील लोक वस्तीमध्ये शिरले आहे. खेड, चिपळूण, संगमेश्वर आणि राजापूर या तालुक्यांमध्ये नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे.

खेडमध्ये जगबुडी आणि चिपळुणात वाशिष्ठी नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी किनार्यावरील लोकवस्तीत शिरल्यामुळे या दोन तालुक्यातील सुमारे दीडशेहून अधिक नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. या ठिकाणी एनडीआरएफची पथके नियुक्त केली असून पुराची शक्यता लक्षात घेऊन दोन्ही तालुक्यांतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात दरड कोसळल्याने काही काळ रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.

खेडमध्ये तर जगबुडी नदीने इशारा पातळीच्या दुप्पट पाण्याची पातळी गाठली असून नदीचे पाणी भरणे पुलावर आले आहे. चिपळूणमधील वाशिष्ठी नदीचे पाणी बाजार पुलावर आल्याने बाजारपेठेत पाणी शिरले आहे. राजापूरमध्ये कोदवली नदीला पूर आल्याने येथील पूल पाण्याखाली गेला आहे. तसेच बाजारपेठेमध्ये पाणी शिरले आहे. संगमेश्वर तालुक्यातील  गडनदीच्या पुराचे पाणी मुंबई-गोवा महामार्गावरील आरवली पुलावरून वाहत आहे. त्यामुळे येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

मंगळवारी रात्रीपासून जिल्ह्यात सर्वत्र वेगवान वार्यासह जोरदार पाऊस सुरु झाला आहे. पावसामुळे खेड शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागाला पावसाने चांगलेच झोडपून काढले. जगबुडी आणि नारंगी या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीलगत असलेली शेती व वीट भट्टय़ा पाण्याखाली गेल्या आहेत. पावसाचा जोर वाढत असून, ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे.

संततधार पावसामुळे खेड मटण – मच्छी मार्केट परिसरासह देवणे बंदर भागात जगबुडी नदीच्या पुराचे पाणी घुसले. मच्छीमार्केट परिसरातील व्यापारी आणि नागरिकांनी दुकानातील माल व अन्य साहित्य सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरुवात केली आहे. भोस्ते गावातील रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने भोस्ते-अलसुरे वाहतूक बंद  केली आहे. अलसुरे येथील मशिदीच्या भोंग्यावरून नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या. तालुक्यातील नारिंगी नदीचे पुराचे पाणी कन्या शाळेजवळ रस्त्यावर आले असल्याने दापोली-खेड रस्ता वाहतुक बंद आहे. आंबावली येथील धनगर वाडी कडे जाणार्या रस्त्याला भेगा पडल्या असून रस्त्यांवर झाड पडले आहे. जगबुडीच्या किनारी भागातील झोपडपट्टीत राहणार्या नागरिकांचे मुकादम हायस्कूलमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे.  खेड तालुक्यात एकूण ४५ कुटुंबातील १६६ जणांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आले आहे.

खेडकडून चिपळूणकडे येणारी लहान वाहने पाली कळंबस्ते मार्गे चिपळूणकडे सोडण्यात येत आहेत.चिपळूणमधील कोळकेवाडी धरण परिसरात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. येथील महाजेनकोचे चारपैकी तीन युनिट चालू असल्यामुळे वक्रदारद्वारे सांडव्यावरुन पाणी विसर्ग करण्याची शक्यता आहे. बोलादवाडी नाला व वाशिष्ठी नदी पात्रालगत नागरिकांनी जाऊ नये, असे आवाहन कोळकेवाडी धरण व्यवस्थापनाने केले आहे. कोळकेवाडी, नागवे, आलोरे, पेंढाबे, खडपोली, पिंपळी खु., पिंपळी बु., सती व खेर्डी सरपंचांना सुचना दिल्या आहेत. वाशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. नाईक कंपनी, मच्छी मार्केट, वडनाका, मुरादपूर येथील काही ठिकाणी  एक फूट पाणी भरलेले आहे. सध्या पाणी कमी होत आहे. पुराची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षिततेसाठी नगर परिषदेच्या बोटी सांस्कृतिक केंद्र, शंकरवाडी, बाजारपेठ विसर्जन घाट, पालिका कार्यालय या पाच ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. तलाठी, पोलीस  व एनडीआरएफ यांची संयुक्त सहा पथके तैनात केली आहेत. एका पथकात ५ तलाठी, ३ पोलीस व ३ जवान आहेत. या पथकासोबत एकूण ४ बोटी आहेत.

चिपळूणात दोन वर्षांपुर्वी आलेल्या महापुराची परिस्थिती लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकार्याशी दुरध्वनीवरुन संपर्क साधत आढावा घेतला. पावसामुळे कुंभार्ली घाटात दरड कोसळलेली होती. तेथील दरड बाजूला करण्याचे काम चालू आहे. आता दोन्ही बाजूंनी वाहतूक चालू आहे. मिरजोळी जुवाड येथील १९ कुटुंबातील ६५ व्यक्तींना नातेवाईकांच्या घरी स्थलांतरीत केले आहे. तर बोरघर (कातकरी वस्ती) येथील ४ घरांना पाणी लागल्याने २२ लोकांना सुरक्षित ठिकाणी  स्थलांतरीत केले आहे.

दुपारीही पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे पुराचे पाणी पसरलेले होते. कुंभार्ली घाटात कोसळलेली दरड बाजूला केल्याने वाहतूक सुरू झाली. तसेच परशुराम घाटातील रस्ता दरड कोसळल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद केलेला आहे. दरड हटविण्याचे काम चालू आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादुरशेख पुलाजवळून एक गाय व एक म्हैस वशिष्ठी नदीत वाहून गेल्या. चिपळूणमधील जुना कॉटेज येथे पाणी पातळी वाढल्यामुळे तीन ट्रान्सफॉर्मर आणि भेंडी नाका येथील एक  ट्रान्सफॉर्मर बंद ठेवल्यामुळे सुमारे साडेतीनशे ग्राहकांचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला.  

दापोली तालुक्यालाही पावसाचा तडाखा बसला असून हर्णे फत्तेगड व राजेवाडी तसेच पाजपंढरी येथून दरडगस्त भागातील ५ कुटुंबातील २४ लोकांना, दाभोळ-ढोरसई येथील ५ कुटुंबांमधील ३५ लोकांना स्थलांतर करण्यात आले. पावसाचे पाणी आल्यामुळे शिरसोली मुगिज रस्ता वाहतूक बंद आहे. जालगाव समर्थ नगर, मित्रनगर भागात अतिवृष्टीमुळे पावसाचे पाणी साचले असून वाहतूकीला अडथळा निर्माण झाला आहे.  अतिवृष्टीमुळे सोळा घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. दापोली तालुक्यात विक्रमी २५० मिलीमीटर पाऊस पडला असून मुंबई, रत्नागिरी, खेड येथे वाहतूक करणाऱ्या एसटी बसगाडय़ा बंद करण्यात आल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजापूर तालुक्यामध्ये दिवसभर सरींवर जोरदार पाऊस पडत होता. त्यामुळे शहरातून वाहणार्या कोदवली आणि अर्जुना या दोन्ही नद्यांच्या पाण्याच्या पातळीने इशारा पातळी ओलांडली आहे. शहरातील मच्छीमार्केट परिसरासह वरचीपेठ रस्ता, शिवाजी पथ रस्ता, गणेश घाट परिसर पाण्याखाली गेला आहे. आंबेवाडी परिसरामध्ये नदीपात्रातील पाणी रस्त्यावर आले आहे. तर, जवाहर चौकातील कोदवली नदीच्या काठावरील टपर्याच्या शेजारी पाणी वाढले आहे. अर्जुना-कोदवली नद्यांनी धोक्याची गाठलेली पातळी आणि पाण्यामध्ये सातत्याने वाढ होत असल्याने  यावर्षी पहिल्यांदा शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे.  संगमेश्वर तालुक्यात सलग दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने गडनदीने धोकादायक पाण्याची पातळी गाठली. म्हणून महामार्गावरील आरवली पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. थोडय़ा वेळाने या ठिकाणी एकरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. संगमेश्वर शहराजवळील शास्त्री नदीचे पाणी इशारा पातळीवरून वाहत आहे.