सावंतवाडी : कोकण रेल्वे मार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मडुरे रेल्वे स्थानकावर कोकण रेल्वे महामंडळाने शेतकऱ्यांच्या खासगी जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भूमिअभिलेख विभागाने केलेल्या सर्वेक्षणात कोकण रेल्वेने तब्बल ३९ गुंठे जमिनीवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाले असून, याविरोधात संतप्त शेतकरी आणि जमीन मालकांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

​काय आहे प्रकरण?

​मडुरे रेल्वे स्थानकासाठी १९९१ मध्ये शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र, कोकण रेल्वे प्रशासनाने मूळ हद्दीच्या बाहेर जाऊन शेतकरी प्रकाश वालावलकर यांच्या मालकीच्या जमिनीवर रस्ता तयार केल्याचा आरोप आहे. वालावलकर यांनी याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या, पण त्यांची दखल घेण्यात आली नाही. अखेर त्यांनी भूमी अभिलेख विभागाकडे मोजणीसाठी अर्ज केला.

​भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांनी या जागेची पाहणी केली असता, शेतकऱ्यांचा आरोप खरा असल्याचे समोर आले. कोकण रेल्वेने हद्दीबाहेर सुमारे ३९ गुंठे जमिनीवर अतिक्रमण केल्याचे स्पष्ट झाले. या अतिक्रमित जागेतील रस्ता काढून ती जमीन पुन्हा वालावलकर यांच्या ताब्यात देण्यास रेल्वे प्रशासन टाळाटाळ करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

​अधिकाऱ्यांना जाब विचारला

​या परिस्थितीमुळे संतप्त झालेले शेतकरी प्रकाश वालावलकर यांनी १५ ऑगस्ट रोजी उपोषणाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेचे वरिष्ठ क्षेत्रीय अभियंता रवींद्र पाटील यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी केली. यावेळी त्यांना स्थानिकांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले. सुरुवातीला त्यांनी महसूल आणि भूमी अभिलेख विभागावर चुकीचा ठपका ठेवण्याचा प्रयत्न केला, पण कागदपत्रे पाहिल्यावर त्यांची चूक लक्षात आली. त्यानंतर त्यांनी नरमाईची भूमिका घेत सामंजस्याने तोडगा काढण्याचे मान्य केले.

​यावर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन रवींद्र पाटील यांनी दिले आहे. शेतकऱ्यांनी अतिक्रमित जमीन तत्काळ खाली करून वापरलेल्या जमिनीचा मोबदला देण्याची मागणी केली आहे. येत्या काही दिवसांत यावर ठोस कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रोणापालचे माजी सरपंच सुरेश गावडे आणि प्रकाश वालावलकर यांनी दिला आहे.