अलिबाग, रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर रेल्वेतून चारचाकी गाड्या घेऊन जाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. मात्र या सुविधेचा लाभ घेण्यासाठी गणेशभक्तांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. शिवाय प्रवासासाठी जास्त वेळही खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू होणाऱ्या या सेवेचा कोकणातील प्रवाशांना नेमका काय लाभ होणार याबाबत साशंकता आहे.

कोकण रेल्वेने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘रोल ऑन रोल ऑफ’ सेवेची घोषणा केली आहे. प्रवाशांना त्यांचे चारचाकी वाहन रेल्वेतून थेट गोव्यापर्यंत नेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. रायगड जिल्ह्यातील कोलाडपासून गोव्यातील वेरणापर्यंत ही सुविधा देण्यात आली आहे, ज्यासाठी आरक्षण सुविधा सुरू करण्यात आली आहे. २३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत ही विशेष रो-रो सेवा गाडी चालवली जाणार आहे. मात्र यासाठी प्रवाशांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.

२० तासांचा कालावधी

कोलाड ते वेरणा दरम्यान प्रवासासाठी १२ तासांचा कालावधी लागणार आहे. मात्र या प्रवासासाठी आपले वाहन घेऊन किमान तीन तास आधी कोलाड येथे दाखल होणे अपेक्षित आहे. याशिवाय मुंबईतून कोलाड येथे पोहोचण्यासाठी अडीच ते तीन तासांचा प्रवास करावा लागणार आहे. गोव्यातून तळकोकणात येण्यासाठी पुन्हा तास-दीड तासाचा प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे किमान २० तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

वाहतूक कोंडी नसेल तर अलिबागवरून गाडीने कणकवलीला सात ते आठ तासांत पोहोचता येते. आठ ते नऊ हजार रुपयांत दोन्ही बाजूंचा इंधन खर्च येतो. त्यामुळे कोकण रेल्वेची रो-रो सेवा ही व्यवहार्य आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही.. – महेश सावंत, सिंधुदुर्ग उत्कर्ष मंडळ, अलिबाग

कोकण रेल्वे मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर ही रो-रो कार सेवा सुरू करत आहोत. सध्या कोलाड ते गोव्यापर्यंत ही सेवा उपलब्ध असेल. चांगला प्रतिसाद मिळाला, तर कोकण रेल्वे मार्गावरील प्रमुख स्थानकांमध्ये रो-रोसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देता येऊ शकतील. – संतोष कुमार झा, व्यवस्थापकीय संचालक तथा कोकण रेल्वे अध्यक्ष

रोरो सेवेचा दर

टप्पा – अंतर – प्रवास खर्च

मुंबई ते कोलाड – १०६ किमी – ८०० ते १००० रु. अंदाजे

कोलाड ते वेरणा – ४१३ किमी – ९९३५ रुपये

वेरणा ते कणकवली – १२७ किमी – ८०० ते १०००रु. अंदाजे
(एक वेळच्या प्रवासासाठी लागणारा अंदाजे खर्च- ११,९३५ रुपये )

या प्रवासाठी प्रवाश्यांना मोठा आर्थिक भूर्दंड सोसावा लागणार आहे. एका वेळेस चाळीस गाड्याच या रेल्वेनी नेल्या जाणार असून, प्रत्येक गाडीसाठी ७ हजार ८७५ रुपयांचे भाडे आकारले जाणार आहे. या शिवाय गाडी सोबत तीन प्रवाश्यांना प्रवास करता येणार असून त्यांना अतिरिक्त प्रवास भाडे द्यावे लागणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तीन पैकी दोन प्रवाश्यांना वातानुकूलीत थर्ड एसी डब्यातून, तर तिसऱ्या प्रवाश्याला द्वितीय श्रेणी डब्यातून प्रवास करावा लागणार आहे. वातानुकूलीत डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांसाठी ९३५ रुपये तर व्दितीय श्रेणी डब्यातून प्रवास करणाऱ्या तिसऱ्या प्रवाश्यासाठी १९० रुपये तिकीट आकारले जाणार आहे. त्यामुळे तीन जणांना गाडीसह प्रवासाठी जवळपास दहा हजार खर्च करावा लागणार आहे. या मुंबईतून कोलाड पर्यंत, आणि वेरणाहून सिंधुदुर्गात आपल्या गावी जाण्यासाठी दोन्ही बाजूने शंभर किलोमीटरचे अंतर पार गाडीने पार करावे लागणार आहे. ज्यासाठी अतिरीक्त प्रवास खर्च वाहनचालकांना सोसावा लागणार आहे. त्यामुळे या रो रो सेवेचा लाभ घेणे ही एक खर्चिक बाब ठरणार आहे.