रत्नागिरी : कोकण रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सव काळात वाढलेल्या प्रवाशांच्या गर्दीचा विचार करून चिपळूण-पनवेल-चिपळूण दरम्यान अनारक्षित विशेष मेमू गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या कोकण रेल्वे मार्गावर बुधवार, ३ सप्टेंबर आणि गुरुवार, ४ सप्टेंबर रोजी धावणार आहेत.
चिपळूण-पनवेल मेमू (गाडी क्रमांक ०११६०) सकाळी ११.०५ वाजता चिपळूणहून सुटेल आणि दुपारी ४.१० वाजता पनवेलला पोहोचेल. परतीच्या प्रवासात पनवेल-चिपळूण मेमू (गाडी क्रमांक ०११५९) सायंकाळी ४.४० वाजता पनवेलहून सुटून त्याच दिवशी रात्री ९.५५ वाजता चिपळूणला पोहोचणार आहे. ही विशेष मेमू गाडी अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, नागोठणे, कासू, पेण, जिते, आपटा आणि सोमाटणे या स्थानकांवर थांबणार आहे.
एकूण ८ कोच असलेली ही गाडी प्रवाशांसाठी सोयीची ठरणार असून, गणेशोत्सव काळात गणेश भक्तांना दिलासा मिळणार आहे.