​सावंतवाडी : ​कोकणच्या नयनरम्य निसर्गाचा अनुभव घेत, डोंगर-घाट आणि समुद्रकिनाऱ्यावरून चालण्याचा एक अनोखा आणि आव्हानात्मक उपक्रम ‘कोकण ट्रेल २०२५’ प्रथमच आयोजित करण्यात आला आहे. ग्रीन ट्रेल फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेला हा ‘वॉकाथॉन’ २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वा. सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावरून सुरू होईल आणि ३० नोव्हेंबरला येथेच समारोप होईल. ​संस्थेचे अध्यक्ष सचिन बिर्जे यांनी या उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, या स्पर्धेत देश-विदेशातील अनेक लोक सहभागी होतील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनीही यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. स्पर्धेचे स्वरूप: ‘कोकण ट्रेल २०२५’ मध्ये दोन प्रमुख प्रकार आहेत:मुख्य ट्रेल: १०० किमी अंतर, जे सलग ५० तासांत पूर्ण करायचे आहे.

लघु ट्रेल: ५० किमी अंतर, जे २५ तासांत पूर्ण करायचे आहे. या ट्रेलमध्ये व्यक्तिगत सहभाग नसून, २, ३ अथवा ४ सदस्यांच्या टीम स्वरूपात सहभाग घेणे अनिवार्य आहे. सर्व इच्छुकांना ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. हा ट्रेल कोकणच्या हिरवाईतून, डोंगर-घाट, समुद्रकिनारा, गाववाडी, नदीकाठ व जंगलातून जातो. सावंतवाडी, वेंगुर्ला तालुक्यातून पुन्हा सावंतवाडी येथे समारोप होईल. सहभागी टीमला त्यांच्या मर्यादा ओलांडण्याची, कठीण ध्येय गाठण्याची आणि कोकणातील निसर्ग, संस्कृती व लोकजीवन अनुभवण्याची ही एक उत्तम संधी आहे.

आयोजकांनी ट्रेल मार्गावर सहभागींच्या सोयीसाठी उत्तम व्यवस्था केली आहे. प्रत्येक १० किमीवर चेकपॉईंट ठेवलेले आहेत, जिथे वैद्यकीय मदत, पाणी, अन्न व सुरक्षेची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. यात सहभागी होणाऱ्या टीमसाठी प्रवेश फी ठेवण्यात आली आहे. ग्रीन ट्रेल फाऊंडेशनने हा उपक्रम स्थानिक प्रशासन, स्वयंसेवी संस्था, महाविद्यालये व विविध संघटनांच्या सहकार्याने आयोजित केला आहे, ज्यामुळे पर्यटनवृद्धी साधली जाईल. यामध्ये स्थानिक खेळाडू, माध्यम प्रतिनिधी, व्यावसायिक यांचाही सहभाग असेल. ​यावेळी संस्थेचे अध्यक्ष सचिन बिर्जे, सदस्य केदार लेले आणि प्रशांत सावंत आदींनी हि माहिती दिली.अधिक माहितीसाठी इच्छुक ९३२५५९६९८६ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.