राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या सुरूवातीपासून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि कोथरूड मतदारसंघ सगळीकडेच चर्चेत आला. त्याला कारण होत चंद्रकांत पाटलांचं पुणेकर नसणं. पण, त्याचीही तजवीज आता पाटील यांनी केली असून, ते लवकरच पुणेकर होणार आहेत. हे खरं असून त्यांनी पुण्यात घरही बघितलं आहे.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघ अनेक मुद्यावरून चर्चेत राहिला. चंद्रकांत पाटील हे बाहेरचे उमेदवार, निवडून आल्यावर प्रश्न कसे सोडविणार, पुण्यात कुठं राहणार अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. आता यावर चंद्रकांत पाटील यांनी पुढे येऊन सांगितले की, “मी पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित असल्याने, कुंबरे टाऊनशीपलगत असलेल्या आर. के. प्रेस्टीजमध्ये माझा एक मित्र राहत आहे. त्या मित्राने तात्पुरते घर राहण्यास दिले आहे,” असे त्यांनी सांगितले. यामुळे आता चंद्रकांत पाटील यांना पुण्यात अखेर घर मिळाले असून, आता ते पुणेकर होणार आहेत.

चंद्रकांत पाटील यांना पुण्याचे रहिवाशी नसल्यावरून बऱ्याच जणांकडून लक्ष्य करण्यात आले. याविषयी लोकसत्ता ऑनलाईनच्या प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला. पाटील म्हणाले की, “मी विधान परिषदेवर १२ वर्षापासून आहे. पुणे जिल्ह्यासह पाच जिल्ह्यांचे प्रतिनिधीत्व करीत आहे. यामुळे मी पुण्याचा की, बाहेरचा यावर चर्चा विरोधकांनी करू नये. मी कोथरूड विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढविणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांशी अधिकाधिक संवाद व्हावा, यासाठी याच भागात राहणार्‍या एका मित्राने तात्पुरते राहण्यास घर दिले आहे,” असं पाटील यांनी सांगितलं.

पुढे बोलताना ते म्हणाले, “कोथरूडच्या जागेवरून विरोधकांकडून मला लक्ष्य केले जात आहे. यातून त्यांच्याकडे मुद्दे आणि माणुसदेखील राहिला नाही. हे राज्यातील जनतेला माहितीच आहे. तर विरोधकांनी असे मुद्दे उपस्थित करावे, की ज्यावर मी निरुत्तर होईल. या सर्व गोष्टींचा विचार करावा,” अशा शब्दात त्यांनी विरोधकांना सुनावले.