कराड : पश्चिम घाटक्षेत्रात पंधरवड्याच्या दीर्घ विश्रांतीनंतर कोसळत असलेला जोरदार पाऊस कायम असून, कोयना धरणाचा जलसाठा नियंत्रित राखण्यासाठी आज रविवारी सायंकाळी चार वाजल्यापासून धरणाच्या दरवाजातून चौथ्यांदा जलविसर्ग सुरू करण्यात आला आहे. कोयनेचे सहाही वक्री दरवाजे दीड फुटांनी उघडून कोयना नदीपात्रात १० हजार क्युसेक (घनफूट) पाण्याचा विसर्ग होत असून, पायथा वीजगृहातून २ हजार १०० क्युसेकचा जलविसर्गही ‘जैसे थे’ आहे.

कोयना पाणलोटात रविवारी सायंकाळी पाज वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत १२३.६६ मिमी. म्हणजेच जवळपास पाच इंच पाऊस होताना, कोयनेच्या धरणसाठ्यात ३.०२ टीएमसीने (अब्ज घनफूट) म्हणजेच धरण क्षमतेच्या २.८६ टक्के पाण्याची आवक झाली आहे. दरम्यान, हा पाऊस खरिपाच्या पेरण्यांना पोषक असल्याने बळीराजा सुखावला असून, सर्वसामान्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

कोयना धरणातील पाण्याची आवक प्रतिसेकंद ३१,५२८ क्युसेकवरून (घनफूट) ३५ हजार २० क्युसेक अशी वाढली आहे. तर, जलसाठा ९१.३१ टीएमसीवरून (८६.७६ टक्के) ९४.०९ टीएमसी (८९.४० टक्के) झाला आहे. अशातच जोरदार पावसामुळे गतीने वाढणारा धरणसाठा नियंत्रित राखण्यासाठी धरणाच्या दरवाजातून १० हजार क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसाचा हा जोर असाच कायम राहिल्यास धरणाचे सहाही दरवाजे दीड फुटावरून आणखी उघडून जलविसर्ग करणे अपरिहार्य होणार आहे. त्यामुळे कृष्णा- कोयना नद्यांच्या पाणीपातळीत सतत वाढ होणार असल्याने या दोन्ही नद्यांकाठी दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. तर, या अनुषंगाने प्रशासनही सतर्क राहिले आहे.

आज रविवारी (दि. १७) सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना पाणलोटातील कोयनानगरला ४० एकूण ३ हजार ३९३ मिमी., नवजाला ७१ एकूण ४ हजार ३९ मिमी., महाबळेश्वर येथे ४२ एकूण ३,९७० मिमी. पावसाची नोंद झाली आहे. कोयना पाणलोटात चालू हंगामात आजवर ३ हजार ८००.६६ मिमी. (वार्षिक सरासरीच्या ७६.०१ टक्के) पाऊस झाला आहे.

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचे चित्र आहे. त्यात दिवसभरात दाजीपूरला सर्वाधिक ७३ मिमी. खालोखाल निवळे व गजापूरला ६३ जोर येथे ५९, प्रतापगडला ५०, मांडुकली व गगनबावडा येथे ४७ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. धरणक्षेत्रात वारणा ३७ मिमी., धोम ६ मिमी., तारळी ७, कडवी २८, धोम-बलकवडी १५, दूधगंगा २६, कुंभी ९, रांजणी तलाव ३ मिमी. असा दिवसभरातील पाऊस आहे.