कराड : पश्चिम घाटात सर्वाधिक पावसाचा तालुका असलेल्या पाटण तसेच कराड तालुक्यातील पावसाचा जोर आज सोमवारी पुरता ओसरला. ढगाळ वातावरणही निवळले. परंतु, पावसाच्या अधूनमधून हलक्या सरी कोसळणे सुरूच आहे. दरम्यान, सलग पावसाने विस्कळीत जनजीवन पूर्वपदावर येत आहे.
सोमवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या नऊ तासांत कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील नवजा येथे ३१, महाबळेश्वराला १७ आणि कोयनानगरला १६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धोम-बलकवडी १३ तसेच उरमोडी धरण परिसरात ११ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर, सातारा जिल्ह्यातील कण्हेर, धोम, मोरणा, नागेवाडी अशा अन्य जलाशय परिसरात तुरळक पावसाची नोंद आहे.
पाऊस ओसरल्याने पुणे- बंगळुरू महामार्गासह अन्य रस्त्यांवर ठिकठिकाणी झालेली तळी, तुंबलेले पाणी निचरा होऊ लागल्याने रेंगाळलेली वाहतूक पूर्वपदावर येऊ लागली आहे. त्यामुळे त्रासलेल्या वाहनधारक, प्रवासी व रस्त्यांकडेच्या लोकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
आठवडाभर कोसळलेला वळीव अजूनही पावसाचे वातावरण कायम ठेवून असतानाच नैर्ऋत्य मोसमी पाऊस उंबरठ्यावर येऊन ठेपल्याने शेतकऱ्यांमध्ये खरीप पिकांच्या पेरणीपूर्व आणि प्रत्यक्ष पेरणीच्या कामांबाबत गोंधळ असून, त्यासंदर्भात सूचना व मार्गदर्शनासाठी कृषी विभाग सतर्क झाला आहे. कराड व पाटणच्या प्रांताधिकाऱ्यांनी पावसाळ्याच्या पाश्वर्भूमीवर आढावा बैठका घेऊन आपत्ती व्यवस्थापनासह खरीप हंगामात शेतकऱ्यांना योग्य व उचित मार्गदर्शनासह मदतीच्या सूचना केल्या आहेत. मात्र, वळीव पावसाने झालेल्या आजवरच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना मंत्रिमहोदयांनी केल्याने यंत्रणेकडून तशा हालचाली सुरू झाल्या आहेत. महामार्ग व अन्य रस्त्यांवरील दुरवस्था व उपाययोजनांसंदर्भात ठोस कृती होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, सलग वळीव पावसाने बाजारात भाजीपाल्याचे घटलेले प्रमाण पूर्ववत होते का, याकडे सर्वसामान्यांच्या नजरा लागून आहेत.