Kunal Kamra Eknath Shinde Controversy Updates : कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवणारं एक गाणं त्याच्या कॉमेडी शोमध्ये सादर केलं. ज्यानंतर चांगलाच वाद निर्माण झाला आहे. कुणाल कामराच्या विरोधात पोलिसात गुन्हाही दाखल झाला आहे. मुंबई पोलिसांनी त्याला समन्स बजावलं होतं पण तो चौकशीसाठी हजर राहिला नाही. आता मुंबई पोलिसांनी त्याला पुन्हा समन्स बजावलं आहे. तसंच यावेळी वाढीव मुदत देण्यासाठी पोलिसांनी नकार दिला आहे. यामुळे कुणाल कामराच्या अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत.

कुणाल कामराला दुसरं समन्स

कुणाल कामराला मुंबई पोलिसांनी दुसरं समन्स बजावलं आहे. कुणाल कामराने चौकशीसाठी यावं यासाठी त्याला पहिलं समन्स बजावण्यात आलं होतं पण तो हजर राहिला नाही. आता त्याला पुन्हा समन्स बजावण्यात आलं आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता हजर राहण्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला पहिलं समन्स पाठवलं होतं. पण तो हजर राहिला नाही. आता एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या वक्तव्यावरुन आणि त्या गाण्यावरुन त्याला पुन्हा समन्स बजावण्यात आलं आहे.

काय आहे हे प्रकरण?

कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता एक गाणं तयार केलं होतं ज्यात त्यांचा उल्लेख गद्दार असा केला होता. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. कुणाल कामराने ज्या हॉटेलमध्ये शो केला त्या ठिकाणी असलेल्या स्टुडिओचीही तोडफोड करण्यात आली. दरम्यान कुणाल कामराने या प्रकरणात चौकशीला येण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे. त्याने त्याच्या वकिला करवी तशी विनंती केली. मात्र पोलिसांनी ही विनंती फेटाळली आहे. दरम्यान मुंबई पोलिसांनी या प्रकरणात हॅबिटट स्टुडिओ तसंच या शोशी संबंधित असलेले इतर लोक यांनाही चौकशीसाठी समन्स बजावलं आहे.

कुणाल कामराविरोधात कुठल्या कलमांखाली गुन्हा दाखल?

कुणाल कामराविरोधात विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ३५३ (१) ब, ३५३ (२) आणि ३५६ (२) बदनामी या कलमांखाली गुन्हे दाखल झाले आहेत. एमआयडीसी पोलीस ठाण्यात कुणाल कामराविरोधात पहिली पोलीस तक्रार दाखल झाली. त्यानंतर हा गुन्हा झीरो एफआयआर म्हणून खार पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुणाल कामराने पोस्टमध्ये काय म्हटलं होतं?

मी पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याचं ठरवलं आहे. पोलिसांनी आणि न्यायालयाने माझ्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी. मात्र कायदा सर्वांसाठी समान असतो त्यामुळे अशाही लोकांविरोधात कारवाई झाली पाहिजे ज्यांनी ते हॉटेल फोडलं. एक जोक ऐकून त्यांनी हॉटेल फोडलं आहे. तसंच जे निवडून आलेले नाहीत अशा महापालिका सदस्यांच्या विरोधातही कारवाई झाली पाहिजे. हॅबिटट या ठिकाणी तोडफोड करायला ते कुठलीही नोटीस न देता हातोडे घेऊन कसे आले? असे प्रश्न कुणाल कामराने विचारले आहेत. पोलिसांना सहकार्य करणार अशी भूमिका त्याचीच आहे. तरीही कुणाल कामरा चौकशीसाठी उपस्थित राहिलेला नाही. त्यामुळे त्याला दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आलं आहे.