कराड : ऊस तोडणीसाठी मजूर देतो, असे सांगून तिघांनी सहा लाख ६७ हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार एकांनी कराड शहर पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांची माहिती अशी, तक्रारदार २०१४ पासून एका सहकारी साखर कारखान्याला ट्रॅक्टरद्वारे ऊस वाहतूक करतात. २०१९-२० मध्ये ऊस तोडणीसाठी एका आरोपीने एक लाख ७४ हजार रुपये आगाऊ रक्कम घेतली. त्याने कारखाना सुरू झाल्यापासून बंद होईपर्यंत काम करण्याचे कबूल केले होते. मात्र, तो मधूनच ९७ हजारांची परतफेड न करता व काम न करता काहीही न सांगता निघून गेला. वारंवार पैसे परत मागूनही पैसे परत केले नाहीत. मुकादमाने ऊस तोडणीसाठी २२ ऊस तोडणी कामगार देतो, असे सांगून १२ लाख २० हजार रुपये आगाऊ रक्कम घेतली.

त्यातील चार लाख ७५ हजार रुपये परतफेड न करता काहीही न सांगता निघून तो गेला. वारंवार पैसे परत मागूनही पैसेही परत केले नाहीत. २०२१-२२ मध्ये ऊस तोडणीसाठी अन्य मुकादमाने दहा ऊस तोडणी कामगार पुरवण्यासाठी आगाऊ रक्कम तीन लाख २५ हजार रुपये घेतले. त्यानंतर मधूनच एक लाख १५ हजार रुपयांची परतफेड न करता व काम न करता तोही निघून गेला. संबंधित तिघांनी सहा लाख ६७ हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

दरम्यान, अलीकडच्या काळात बीड, बार्शी, अहिल्यानगर येथील ऊस वाहतूक कामगार ठेकेदारांकडून ऊस तोडणीसाठी मजुरांच्या टोळ्या देतो म्हणून सातत्याने साखर कारखानदार व ठेकेदारांची लाखो रुपयांची फसवणूक होत असून, त्यातून धडधडीत लूट सुरु असल्याचे यातील जाणकारांचे म्हणणे आहे. अनेक ट्रक, ट्रॅक्टर मालक, ठेकेदार देशोधडीला लागले आहेत. पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हे दाखल होतात. माध्यमातून यावर आवाजही उठवला जातो. परंतु, पुढे तपासात फसवणूक करणारे गुन्हेगार मिळून येत नाहीत, मिळालेच तर, दीर्घ काळ दावे चालतात. दुसरीकडे फसवणूक झालेले कर्जबाजारी होतात, अशी शोकांतिका आहे.