|| रवींद्र केसकर

परंडा तालुक्यातील आलेश्वर येथील गावकऱ्यांचा दैनंदिन संघर्ष

भारताला स्वातंत्र्य मिळून येत्या १५ ऑगस्टला ७२ वर्षे पूर्ण होतील. एवढी वर्षे होऊनही परंडा आलेश्वर या गावापर्यंत अनेक सोयी-सुविधा पोहोचल्या नाहीत. गावाला जायला धड रस्ता नाही. पावसाळ्यात नदीपात्रालगतच्या चिखलमय रस्त्यातून वाट काढत जावे लागते, तर नदीला पाणी आल्यास जीव मुठीत धरून होडीतून पैलतीर गाठावा लागतो.

आलेश्वर हे गाव जिल्ह्य़ातील परंडा शहरापासून ३२ तर करमाळा तालुक्यापासून केवळ १२ किलोमीटर अंतरावर आहे. परंडय़ाहून आलेश्वर गावाकडे जाण्यासाठी दिवसभरात केवळ दुपारी एकच बस आहे. तीच परत येते. त्या व्यतिरिक्त प्रवासाचे दुसरे साधन नाही. त्यामुळे ग्रामस्थ आपल्या मुलांना माध्यमिकच्या पुढील शिक्षणासाठी करमाळा शहरातील महाविद्यालयात प्रवेश घेऊन देतात. आलेश्वर ते करमाळा हे अंतर कमी असल्याने बहुतांश विद्यार्थी व ग्रामस्थांचा करमाळ्याशीच संपर्क आहे. परंडा तालुका केवळ नावाला राहिला आहे.

आलेश्वर गाव दोन हजार लोकवस्तीचे असून तेथे पहिली ते सातवीपर्यंत शिक्षणाची सोय आहे. पुढील शिक्षणासाठी करमाळा येथेच जावे लागते. मात्र वेळेवर जाण्यासाठी वाहतुकीची कसलीच सोय नसल्याने सीना नदीच्या पात्रातून चिखल तुडवीत जावे लागते. तर नदीला पाणी आल्यास होडीतून नदीपलीकडे करमाळा तालुक्यातील वाघाचीवाडी, मीरगव्हाण ही गावे असून तेथून करमाळा आगाराची बस पकडावी लागते. नाइलाजास्तव विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा हा दिनक्रमच बनला आहे.

गावात कोणी आजारी पडल्यास रुग्णाला तत्काळ उपचारासाठी नेताना नातेवाईकांचे मोठे हाल होतात. ज्यांची आíथक परिस्थिती चांगली आहे. ते खासगी वाहन भाडय़ाने घेऊन सोय करतात. मात्र, ज्यांची आíथक परिस्थिती खासगी गाडी भाडय़ाने करण्याची नाही त्यांचे मात्र हाल होतात.

कमालीची उदासीनता

आलेश्वर गावाजवळून गेलेल्या सीना नदीवर पूल झाल्यास भूम, परंडा, कळंब, नगर, करमाळा आदी मोठी शहरे या रस्त्याने जोडली जातील. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र एकमेकांना जोडले जातील. परंतु लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या उदासीनतेमुळे स्वातंत्र्याची ७० वष्रे उलटूनही पूल बांधण्याची तसदी प्रशासनाने घेतलेली नाही. परिणामी पावसाळ्यात शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना नदीपात्रातून चिखलातून तर नदीच्या पात्रात पाणी असल्यास होडीतून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. यंदाही त्यामुळे धोका वाढला आहे.

आलेश्वरसह चार गावांची गैरसोय

आलेश्वरच्या शेतकऱ्यांना शेतीमालाच्या विक्रीसाठी टेम्पोसारख्या वाहनाचा वापर करावा लागतो. मात्र इतरवेळी चिखलातून अथवा होडीचाच आधार घ्यावा लागतो. आलेश्वरकरांसह बंगाळवाडी, गोसावीवाडी, कौडगाव, देऊळगाव येथील ग्रामस्थ देखील या मार्गाने प्रवास करतात. येथील ग्रामस्थांचीही वर्षभर मोठी गरसोय सुरू आहे, अशी माहिती आलेश्वरचे पोलीस पाटील सादिक सय्यद यांनी दिली.

रुग्णांच्या उपचारासाठी होते कसरत

सीना नदीपात्रावर पूल नसल्याने आलेश्वर ग्रामस्थांना गावात कोणी आजारी पडल्यास मोठी कसरत करावी लागते. गावातील वृद्ध नागरिक तसेच गर्भवती महिलांना ऐनवेळी दवाखान्यात नेण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. नदीच्या पलीकडे चालत जाणे तसेच नदी ओलांडण्यासाठी होडीतून जीवघेणा प्रवास करावा लागतो. अशावेळी रुग्ण दगावण्याच्या घटनादेखील घडलेल्या आहेत, असे सेवानिवृत्त मुख्याध्यापक शालीवाहन पाटील यांनी सांगितले.