लातूर : जिल्ह्यातील तावरजा नदीचे पाणी भुसणी उच्च पातळी बंधाऱ्यात साठत गेले. मात्र, दरवाजे न उघडल्याने शेतात पाणी गेल्याने शेतकरी खंडू रामकिसन देवकते यांची आठ एकर शेती पूर्णपणे पाण्यात गेली. डोळ्यासमोर शेती पाण्यात गेल्याने अस्वस्थ झालेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.

गुरुवारी रात्री ७ वाजल्यापासून स्वातंत्र्य दिनाच्या पहाटेपर्यंत तावरजा नदीच्या परिसरात मुसळधार पाऊस झाला. पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात भुसणी बॅरेजमध्ये साचले, मात्र बॅरेजचे दरवाजे न उघडल्याने पाणी शेतात घुसून पिके जलमय झाली. या घटनेत ५० वर्षीय शेतकरी खंडू रामकिसन देवकते यांची आठ एकर शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली. हातात आलेले पीक डोळ्यासमोर नष्ट झाल्याने ते मानसिक तणावात गेले आणि सकाळी गळफास घेऊन त्यांनी आपले जीवन संपवले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आणि दोन मुली असा परिवार आहे. सर्व मुलांचे विवाह झालेले आहेत.

घटनेची माहिती मिळताच आमदार अमित देशमुख यांनी देवकते कुटुंबाची भेट घेतली. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने गावात शोककळा पसरली असून पाऊस पडल्यानंतरही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने ग्रामस्थांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

मराठवाड्यात सर्वदूर पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. कालपासून संततधार पाऊस सुरू आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने आपत्तीच्या सूचना वेळेवर पोहोचवल्या नाहीत. लातूर जिल्ह्यात नद्यांवर उच्च पातळी बंधारे आहेत. त्यातील अनेक ठिकाणी दरवाजे नादुरुस्त आहेत. पाणी अडल्याने आजूबाजूच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यातूनच नुकसान झाल्यामुळे हवालदिल झालेल्या खंडू देवकते यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना करावी असे आमदार देशमुख यांनी म्हटले आहे.