अतिवृष्टीने कोटय़वधींचे नुकसान; मदतीबाबत नुसती आश्वासने

जळगाव : चाळीसगांव तालुक्यात अतिवृष्टीमुळे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये ६८४ शेतकऱ्यांची १५ हजार ८०० हेक्टरवरील शेती, २२५० घरे आणि दुकानांचा समावेश आहे. नैसर्गिक संकटात २६३० जनावरांचा मृत्यू झाला. पशुधन नष्ट झाल्यामुळे परिसरात पोळा देखील साजरा झाला नाही. नुकसानग्रस्त भागात लोकप्रतिनिधी, मंत्र्यांचे दौरे सुरू झाले असून आता मागण्या आणि आश्वासनांचा वर्षांव होत आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे पूरग्रस्तांना अन्नधान्य आणि रोख स्वरूपात मदत जाहीर करण्याची मागणी होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या आठवडय़ात चाळीसगाव तालुक्याने पावसाच्या रौद्र रूपाचा अनुभव घेतला. गौताळा डोंगर भागात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने झालेले प्रचंड नुकसान प्राथमिक पंचनाम्यातून उघड झाले. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करत स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. राज्य शासनाकडून लवकरात लवकर मदत जाहीर करण्याचे आश्वासन दिले. मात्र, पुराचा तडाखा बसून आठवडा उलटून गेला असला तरी नुकसानग्रस्त अजूनही मदतीची वाट बघत असल्याचे चित्र आहे. जयंत पाटील यांनी नदीपात्रातील अतिक्रमण काढण्याचे निर्देश दिले असले तरी महसूल आणि नगरपालिका प्रशासनाकडून त्या अनुषंगाने पावले टाकली गेलेली नाहीत.

अतिक्रमणचा प्रश्न पूर्वीप्रमाणे कायम आहे. दुसरीकडे जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी चाळीसगावमधील पूरग्रस्तांना पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे मदत देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. कोकणात दिलेल्या मदतीनुसार नुकसानग्रस्तांना मदत देण्याची मागणी खासदार उन्मेष पाटील यांनी केली आहे. आ. मंगेश चव्हाण यांनी ५० घरे बांधून देण्याचे आश्वासन दिले. माजी आमदार राजीव देशमुख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तात्काळ मदत देण्याची मागणी केली आहे.

राजकीय पातळीवर पाठपुरावा सुरू असला तरी पूरग्रस्त भागातील नागरिकांना शासकीय मदत मिळण्यासाठी अजून आठवडाभराचा अवधी लागणार असल्याचे महसूल विभागाचे म्हणणे आहे.

राजकीय पातळीवर मागण्या आणि आश्वासनांची लाट आली असली तरी दुसरीकडे विविध संस्था, मित्रमंडळ, दानशूर नागरिक यांच्याकडून पूरग्रस्तांना सामाजिक आधार मिळत आहे. रेड स्वस्तिक, शिवसेना वैद्यकीय कक्ष, सत्यसाई ट्रस्ट, सह्य़ाद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, वसुंधरा फाऊंडेशन, राज फाऊंडेशन आदी संस्था पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावल्या आहेत. अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले. ते कसे भरून निघणार, याची भ्रांत पूरग्रस्तांना आहे. या आपत्तीत १७० घरांचे पूर्णत: तर १४८१ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. २०१ दुकाने, २९० टपऱ्या, ७५ झोपडय़ा, ३५ गोठा शेडचे नुकसान झाले. सहा मंडळात ६८४ शेतकऱ्यांच्या २६३० जनावरांचा मृत्यू झाला. बाणगावातील सर्वाधिक १२० शेतकऱ्यांच्या पशुधनाचे नुकसान झाले. पंचनाम्यानंतर शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, दरडी कोसळल्याने बंद झालेला कन्नड घाटही अद्याप सुरू झालेला नाही. लहान वाहनांसाठी १० सप्टेंबपर्यंत घाट खुला करण्यात येईल तसेच अवजड वाहनांना मात्र प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती महामार्ग प्राधिकरण विभागाने दिली. घाटात दोन ठिकाणी संरक्षक भिंत तर आठ ठिकाणी दरड कोसळल्या. दगड, माती, चिखल काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

कन्नड घाट बंद असल्यामुळे महामार्गावरील हॉटेल व्यावसायिक, पेट्रोल पंपावरील कामगार वर्गही विवंचनेत आहे. औरंगाबादकडे जाण्यासाठी नांदगाव शिऊरमार्गे वाहतूक वळविण्यात आल्याने दोन तासाचा प्रवास चार तासांनी वाढला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leaders visiting to chalisgaon due to huge loss in flood zws
First published on: 08-09-2021 at 00:04 IST