राहाता : लोणी बुद्रुक येथे गेल्या एक महिन्यापासून पिंजऱ्याला हुलकावणी देणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. लोणी बुद्रुक येथील जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे संपर्क कार्यालय असलेल्या जनसेवा कार्यालयाजवळील हळपट्टी शिवारात मनीषा श्याम कोते यांच्या ४७१/१ गटात गाईंच्या गोठ्याशेजारील शेतामध्ये लावलेल्या पिंजाऱ्यामध्ये ४ ते ५ वर्ष वयाचा नर बिबट्या जेरबंद करण्यात वनविभाग व प्राणिमित्र यांना यश आले.

गेल्या काही महिन्यांपासून दोन बिबट्यांचा मुक्त संचार परिसरात वाढला होता. परिसरातील पाळीव कुत्र्यांचा या बिबट्यांनी फडशा पाडल्याने मनीषा कोते यांनी पिंजाऱ्याची मागणी केली. त्यानंतर वनविभागाने पिंजरा उपलब्ध करून दिला.

सुरुवातीला खाद्य म्हणून कोंबड्या ठेवण्यात आल्या परंतु बिबट्या आकर्षित झाला नाही. त्यांनतर त्यांनी काही दिवस शेळी ठेवण्यात आली, पण बिबट्या काही जेरबंद होत नव्हता म्हणून सोमवारी संध्याकाळी कुत्र्याचे पिल्लू पिंजऱ्यात ठेवले आणि पहाटे ५ च्या दरम्यान दरवाजाचा आवाज आल्यावर ग्रामसेवक राम कोते व कामगार भारत शिंदे व हरी बर्डे यांनी बिबट्या जेरबंद झाल्याची खात्री केली व पहाटे प्राणिमित्र विकास म्हस्के यांना कळवले. विकास म्हस्के, वनरक्षक प्रतीक गजेवर यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करून पिंजरा हलवला.

बिबट्याची वैद्यकीय तपासणी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भालेराव यांनी केली. त्यांच्या निरीक्षणात जेरबंद बिबट्यास शासकीय रोपवाटिकेत ठेवण्यात आले आहे. एक बिबट्या जेरबंद झाला असला तरी अजूनही दोन मोठे बिबटे परिसरात मुक्तसंचार करत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. वनविभागाने या ठिकाणी परत पिंजरा लावावा, अशी स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे.

नगर जिल्ह्यात अलीकडच्या काळात बिबट्याचा उपक्रम मोठ्याप्रमाणे वाढलेला आहे. त्या तुलनेत वनविभाग प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात कमी पडत आहे.

अनर्थ टळला

काही दिवसांपूर्वी मंत्री राधाकृष्ण विखे यांचे स्वीय सहायक अशोक बिडवे हे रात्री उशिरापर्यंत जनसेवा कार्यालयात कामकाज करत असताना ८.३० च्या सुमारास त्यांनी खिडकीतून बाहेर डोकावले असता मोठा बिबट्या त्यांच्याकडे पाहत खिडकीकडे येताना दिसला. त्यांनी ताबडतोब कार्यालयाच्या खिडक्या व दार बंद करून सुरक्षारक्षकांची मदत घेऊन बाहेर पडले. कार्यालयाचा दरवाजा उघडा होता. तो जर तातडीने बंद केला नसता तर बिबट्या कार्यालयात घुसला असता, परंतु अनर्थ टळला.