Local Self-Government Elections On EVM In Maharashtra: गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आज राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी घोषणा केली. यामध्ये सर्वात आधी नगरपंचायती आणि नगरपरिषदांची निवडणूक होणार असल्याचे त्यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी राज्य मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी या सर्व निवडणुका ईव्हीएमवर होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएममध्ये गैरप्रकार झाल्याचे आरोप विरोधकांनी केले होते. त्यावेळी हा मुद्दा राष्ट्रीय स्तरावरही चर्चेत आला होता. त्यानंतर विरोधी पक्षांनी इथून पुढे होणाऱ्या सर्व निवडणुका मतपत्रिकांवर घेण्यात याव्यात अशी जोरदार मागणी केली होती. मात्र आज राज्य निवडणूक आयुक्तांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ईव्हीएमवरच मतदान घेतले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना मुख्य राज्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, “नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकांच्या संदर्भातील मतदार यादी ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध झाली आहे. तर, मतदार केंद्र निहाय मतदार याद्या ७ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहेत. निगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीसाठी एकणू १ कोटी ३ हजार ५७६ मतदार आहेत. यासाठी एकूण १३ हजार ३५५ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकांसाठी पुरेशा ईव्हीएम ची व्यवस्था करण्यात आली असून, या निवडणुकांची मतदान प्रक्रिया ईव्हीएम द्वारेच होणार आहे.”
निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील २४६ नगरपरिषदांसाठी निवडणुका होणार आहेत. यामध्ये १४७ नगरपंचायतींपैकी ४२ नगरपंचायतींसाठी पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे, तर उर्वरित १०५ नगरपंचायतींनी अद्याप त्यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला नाही.
कसा असेल निवडणूक कार्यक्रम?
- अर्ज दाखल करण्यास सुरुवात: १० नोव्हेंबर २०२५
 - अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत: १७ नोव्हेंबर २०२५
 - अर्जांची छाननी: १८ नोव्हेंबर २०२५
 - अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत: २१ नोव्हेंबर २०२५
 - आक्षेप असलेल्या ठिकाणी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत: २५ नोव्हेंबर २०२५
 - निवडणूक चिन्ह व उमेदवारांची अंतिम यादी: २६ नोव्हेंबर २०२५
 - मतदान: २ डिसेंबर २०२५
 - मतमोजणी: ३ डिसेंबर २०२५
 - निकाल जाहीर करण्याचा दिवस: १० डिसेंबर २०२५
 
