राहाता : महाविद्यालयातील विद्यार्थिनींची चित्रफीत काढून त्या समाज माध्यमावर प्रसारित करणाऱ्या श्रीरामपूर येथील दोन तरुणांविरुद्ध लोणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली. शाहिद हुसेन शेख, (वय २१) व सातहशम सय्यद, (वय २०, दोघेही रा. श्रीरामपूर ) असे अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत.श्रीरामपूर येथील हे दोन तरुण लोणी परिसरामध्ये गेले होते. तेथे त्यांनी एक चित्रफीत तयार करून ती समाज माध्यमावर प्रसारित केली.
चित्रफितीत हे दोन्ही तरुण श्रीरामपूरवरून लोणी येथे महाविद्यालयात आलेल्या मुलींची टिंगलटवाळी करण्यासाठी आल्याबाबत परस्परांशी बोलत असल्याचे दिसत होते. केवळ मुलींची छेड काढणे हा त्यांचा उद्देश असल्याचे निदर्शनास आल्यावर पोलिसांनी शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत त्यांनी या कृत्याची कबुली दिली.
पोलिसांनी स्वतः फिर्याद देत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली. या दोघांकडून मोबाइल तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त केली. या दोन आरोपींनी आपल्या बेकायदेशीर वर्तनाची माफी मागितल्याची चित्रफीत प्रसारित केली आहे.पोलीस विभागाकडून समाज माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या विविध पोस्टवर लक्ष ठेवण्यात येत असून जर कोणी अशा प्रकारे गैरवर्तन करून आपत्तीजनक पोस्ट प्रसारित करत असल्यास त्यांच्यावर पोलीस स्वतः फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करत आहेत.
महिला, मुली यांच्याशी संबंधित गैरप्रकार करणाऱ्यांवर गंभीर कारवाई करण्यात येईल. शाळा, महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मुलींनी असे कोणाकडूनही गैरप्रकार किंवा गैरवर्तन होत असल्याचे दिसून आल्यास त्यांनी तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्याची संपर्क साधावा. जेणेकरून अशा गैरवर्तन करणाऱ्यांवर गंभीर कारवाई करण्यात येईल असा इशारा श्रीरामपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिला.