एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे राज्यात सत्तांतर झाले. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यामुळे आगामी काळात राज्यातील सत्तासमीकरणं बदलण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राज्यात मुंबई, कल्याण डोंबिवली, औरंगाबादसह अन्य शहरांच्या पालिका निवडणुका जवळ आल्या आहेत. असे असताना सध्या सुरू असलेले राज्य विधिमंडळ अधिवेशन तसेच पालिका निवडणुका लक्षात घेता महाविकास आघाडीने आज (२३ ऑगस्ट) महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. मुंबईत संध्याकाळी ही बैठक होणार आहे. या बैठकीबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अधिक माहिती दिली आहे.
हेही वाचा >> शिंदे विरुद्ध ठाकरे : सत्तासंघर्षाचा फैसला २५ ऑगस्टला होणार? प्रकरण ५ सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग!
“राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, अजय चौधरी अशा सर्वांचे एकत्र बैठक घेण्याचे ठरले. हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू झाला आहे. त्यामुळे या काळात विरोधी पक्ष म्हणून आम्ही सर्वजण पुढे जात आहोत. आमच्यामध्ये एकी ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. या बैठकीला उपस्थित राहण्याची विनंती उद्धव ठाकरे यांना केली होती. ही विनंती त्यांनी मान्य केली. ते त्यांच्या परीने मार्गदर्शन करतील. महाविकास आघाडीमधील आमदारांत एक चांगला संदेश जाईल, हा या बैठकीमागचा उद्देश आहे,” असे अजित पवार यांनी सांगितले.
हेही वाचा >> Video : “करुणा दाखवली…”, एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ विधानावर अजित पवारांचा आक्षेप; म्हणाले, “बोलताना मर्यादा…”!
दरम्यान, सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. राज्य सरकारकडून वेगवेगळी विधेयके मान्यतेसाठी सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येत आहेत. या विधेयकांवर चर्चा करताना विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळत आहे.