सातारा : सलग सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर,पाचगणी पर्यटकांनी बहरून गेले आहे. मोठ्या संख्येने दाखल झालेले पर्यटक पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटत आहेत. लिंगमळा धबधब्यासह वेण्णालेक, ऑर्थरसिट पॉईंट यासह विविध पॉईंटवर पर्यटकांची गर्दी पहायला मिळत आहे. बाजारपेठेतही पर्यटक फेरफटका मारताना गर्दी दिसत आहेत. लिंगमळा धबधब्यासह वेण्णालेकवर पर्यटकांची गर्दी आहे. पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन केले आहे. भर पावसात पर्यटकांची व त्यांच्या वाहनांची मोठी गर्दी महाबळेश्वर पाचगणी येथे आहे.
स्वातंत्र्यदिनापाठोपाठ श्रीकृष्ण जन्माष्टमी व रविवार अशा सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर गजबजले आहे. शहरासह परिसरातील रिसॉर्ट्स, रेस्टॉरंटसह, हॉटेलमध्ये केलेली आकर्षक सजावट पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. सध्या अधूनमधून काहीशी पावसाची रिमझिम सुरु आहे. एक महिना आधीपासून पर्यटकांनी हॉटेल्स, लॉजिंग, व्हिला, बंगलो आदी आरक्षित केल्याने शहरात ऐनवेळी दाखल होणार्या पर्यटाकांना हॉटेल्ससाठी शोधाशोध करावी लागत आहे. प्रसिद्ध केट्स लॉडविक पॉईंटसह ठिकठिकाणी पर्यटकांची रेलचेल अनुभवायला मिळत आहे. शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारे किल्ले प्रतापगड, हस्तकला केंद्र परिसरातदेखील पर्यटकांची रेलचेल आहे.
पवित्र श्रावण महिना असल्यामुळे श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील सर्वच मंदिरामध्ये भाविक भक्तांची दर्शनासाठी चांगलीच गर्दी होत आहे. प्रमुख आकर्षण असलेला लिंगमळा धबधबा ओसंडून वाहत आहे. हिरव्यागार डोंगररांगांमधून उंचावरून कोसळणारा हा धबधबा पाहणे पर्यटकांसाठी पर्वणीच ठरत आहे. अनेकजण या धबधब्याचे फोटो आपल्या मोबाईलमध्ये कैद करताना दिसत आहेत. लिंगमळा धबधबा परिसर फुलून गेला आहे तर मेटगुताड येथील प्रतिभूशी डॅम परिसरातदेखील पर्यटकांची चांगलीच रेलचेल अनुभवायास मिळत आहे. महाबळेश्वरच्या प्रसिद्ध मुख्य बाजारपेठेत विंडो शॉपिंगसाठी देखील पर्यटकांची गर्दी होत आहे.संततधार हलका मध्यम पाऊस, थंडगार वातावरणात उबदार कपडे खरेदीसह येथील प्रसिद्ध चप्पल्स खरेदी करताना पर्यटक दिसत आहेत.
महाबळेश्वर पालिकेच्या प्रसिद्ध वेण्णालेक नौकाविहार व चौपाटी परिसरात पर्यटकांची चांगलीच रेलचेल आहे. दाट धुकं, जोरदार वाहणारा थंडगार वारा व रिमझिम बरसणार्या पावसाच्या सरी अंगावर झेलत पर्यटक पर्यटनाचा आनंद घेत असल्याचे पहावयास मिळत आहे. हौशी पर्यटक अशा वातावरणात घोडसवारी करताना दिसत असून वेण्णालेक चौपाटीवर खवय्यांसाठी गरम गरम मका कणीस, मॅगी, मका भेळ, आलेदार चहा यासह जिभेचे चोचले पुरवणार्या अनेकविध खाद्यपदार्थांचीही रेलचेल आहे.