सतीश कामत, लोकसत्ता

रत्नागिरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील मांगेली ते कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्याच्या डोंगराळ पट्टयात २२ पट्टेरी वाघ आढळल्याची शास्त्रीय नोंद असतानाच प्रसिद्ध निसर्ग पर्यटनस्थळ असलेल्या आंबोली परिसरातही वाघांचा संचार असल्याचे उघड झाले आहे.  विशेष म्हणजे, व्याघ्रसंचाराची छायाचित्रे, चित्रफिती वेळोवेळी सादर होऊनही वनविभाग याचा इन्कार करत आहे. त्यामुळे पर्यावरणवादी संस्थांनी हा परिसर संवेदनशील म्हणून जाहीर करण्यासाठी थेट न्यायालयाचे दार ठोठावले आहे.

सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील घनदाट जंगलांनी मढलेल्या कोकणाच्या निसर्गसौंदर्याचे कौतुक शासकीय स्तरावर होत असले तरी, त्याच्या संवर्धनासाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. उलट या डोंगराळ भागात विकासकामे आणि पर्यटनकेंद्राच्या नावाखाली होणाऱ्या बेसुमार वृक्षतोडीकडे दुर्लक्ष केले जात आहे. हा परिसर संवेदनशील क्षेत्र म्हणून जाहीर करण्यासाठी वनशक्ती संस्थेचे अध्यक्ष स्टॅलिन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खडपडे येथे पट्टेरी वाघ आढळल्याची चित्रफित काही दिवसांपूर्वी प्रसारीत झाली होती. हा पुरावा न्यायालयात सादर करण्यासाठी स्टॅलिन यांनी येथे जाऊन पाहणी केली असता, त्यांनाही वाघाच्या पावलांचे ठसे आढळून आले. वाघाची काही ताजी छायाचित्रेही त्यांना मिळाली आहेत.

हेही वाचा >>> माझं बोट धरून राजकारणात आले असते तर…”, पंतप्रधान मोदींच्या त्या विधानावर शरद पवारांची फिरकी; म्हणाले…

‘डेहराडून येथील वाइल्ड लाइफ इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या शासकीय संस्थेचे प्रसिद्ध वन्यजीव शास्त्रज्ञ डॉ. बिलाल यांनी केलेल्या पाहणीत दोडामार्ग तालुक्यातील मांगेली ते कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्य भागांत २२ पट्टेरी वाघांचा वावर आढळून आला. इतक्या मोठया संख्येने वाघ असणे ही साधी गोष्ट नाही,’ असे स्टॅलिन यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.  मांगेली ते आंबोली या भागात वाघांचे अस्तित्वच नसल्याचे वन विभागाचे अधिकारी आजवर सांगत आले आहेत. मात्र, आता वाघानेच आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. दोडामार्ग तालुक्यामध्ये सरसकट वृक्षतोड बंदी असताना वनविभागाच्या राखीव वनासह सुमारे तेराशे एकर क्षेत्रावरील जंगलात वृक्षतोड झाली आहे. याला वनविभाग आणि जिल्हाधिकारी जबाबदार असल्याचा पर्यावरणवादी कार्यकर्त्यांचा दावा आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधातही न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे स्टॅलिन यांनी सांगितले.

पट्टेरी वाघांचे या परिसरातील अस्तित्व पाहता येथे विदर्भाप्रमाणे उत्कृष्ट व्याघ्र प्रकल्प विकसित होऊ शकतो. पण येथील राज्यकर्ते किंवा लोकप्रतिनिधी त्या दृष्टीने काही दीर्घकालीन नियोजन करत नाहीत. त्यामुळे  पर्यटन जिल्हाह्ण म्हणून सिंधुदुर्ग बऱ्याच वर्षांपूर्वी जाहीर होऊनही तेथे पर्यटन फारसे विकसित झालेले नाही. – स्टॅलिन डी., वनशक्ती संस्था

शक्तिपीठ महामार्गाला विरोध

राज्यातील धार्मिक पर्यटनस्थळे जोडण्यासाठी राज्य शासनाने नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाचे नियोजन केले आहे. सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीतील गावांतून हा मार्ग जात आहे. मात्र, त्यामुळे या दोन्ही तालुक्यांतील हरितपट्टा उद्ध्वस्त होणार आहे. त्यालाही पर्यावरणवाद्यांचा विरोध असून ‘शक्तिपीठ’ महामार्गाला न्यायालयात आव्हान देण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.