लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने १९५ मतदारसंघातील उमेदवारांची यादी नुकतीच जाहीर केली. देशातील १६ राज्यातील उमेदवारांचा या यादीत समावेश होता. मात्र महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा या यादीत समावेश नव्हता. त्यावरून काँग्रेसने भाजपावर टीका करण्याची संधी साधली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना दोन-दोन की तीन-तीन जागा द्यायच्या हे निश्चित झालेले नाही, त्यामुळे महाराष्ट्राची यादी तयार झालेली नाही. जेव्हा दोन्ही पक्षांच्या चार-चार जागा अंतिम होतील, त्यावेळेस महाराष्ट्रातील यादी जाहीर होईल.

मराठा समाजाने उमेदवार उभे करू नयेत

“मराठा समाजाला फसवण्याचे काम सरकारने केले आहे. हे लपून राहिलेले नाही. जुन्या चुका परत करून समाजाला न टिकणार आरक्षण दिल आहे, अशी मराठा समाजाची समज झाली आहे. मराठा समाजाचा सर्व रोष सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे. मतदानांवर डोळा ठेवून असे तकलादू निर्णय घेण्याचा उद्योग सरकारने यापूर्वीही केला आहे. आमची मराठा समाजाला विनंती आहे की, निवडणुकीला उमेदवार उभे करण्यापेक्षा जो मराठा समाजाच्या आड येतोय, त्याला आडवा करण्यासाठी निवडणुकीत त्याप्रमाणे मतदान करावे. मनातील राग काढण्यासाठी उमेदवार उभे करणे योग्य राहणार नाही”, अशी भूमिका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. नागपूर येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना विविध प्रश्नांवर उत्तरे दिली.

प्रकाश आंबेडकर आमच्याबरोबरच..

माध्यमांशी संवाद साधत असताना विजय वडेट्टीवार यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली. नुकतेच प्रकाश आंबेडकर यांनी मविआच्या बैठकांना जाऊ नका, असे आदेश आपल्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार म्हणाले की, आमची चर्चा झालेली आहे. दोन दिवसांत तीनही पक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलतील ५ किंवा ५ मार्चपर्यंत हा तिढा पूर्ण सुटेलेला दिसेल.

संजय गायकवाड यांच्यावर कारवाई होणार नाही

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवजयंतीच्या मिरवणुकीत एका युवकाला जबर मारहाण केली. त्यावर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार म्हणाले की, सरकार बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करत नाही. गुंडाना संरक्षण देणाऱ्यांवर कारवाई करत नाही. खून करणारे, बेताल वक्तव्य करणारे, महिलांबद्दल वक्तव्य करणारे आणि जाहीर ठार मारण्याची धमकी देणाऱ्यांविरोधात कारवाई होत नाही. हे सगळं सत्ता आणि सत्तेतून आलेल्या पैशांच्या मस्तीचा परिणाम आहे. त्यामुळे कारवाईची अपेक्षा करणे कितीही अन्याय झाला तर न्याय मिळेल हे गैरसमज आहे, असं मला वाटतं.