गडचिरोली जिल्ह्य़ातील किटाळी येथे केंद्र

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रवींद्र जुनारकर, चंद्रपूर</strong>

नक्षलवादी चळवळीच्या विरोधात कठोर भूमिका घेणाऱ्या राज्य पोलिसांच्या सी-६० कमांडो पथकाला केंद्रीय गृहमंत्रालयाने गौरविले आहे. अन्य राज्यांनी महाराष्ट्राच्या या पथकाचा आदर्श घेऊन त्या पद्धतीने प्रशिक्षण द्यावे, असे पत्रच गृहसचिवांनी नक्षलवादीग्रस्त राज्यांना पाठविले आहे.

नक्षलवादी चळवळीसाठी कर्दनकाळ ठरलेल्या व गडचिरोली जिल्हा पोलीस दलासाठी अभिमान असलेल्या सी-६० पथकाला आधुनिक पद्धतीचे प्रशिक्षण देण्यासाठी गडचिरोली जिल्हय़ातील किटाळी येथे प्रशिक्षण केंद्र उभे राहत आहे. राज्य व केंद्र सरकारच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या केंद्राला दर वर्षी ३ कोटीचा निधी दिला जात असून २०२० पर्यंत हे केंद्र अत्याधुनिक व्यवस्थेने सुसज्ज असणार आहे. गडचिरोली, गोंदिया व चंद्रपूर या तीन जिल्हय़ातील सी-६० कमांडोंना आधुनिक प्रशिक्षण दिले जाणार आहे.

कसनासूर-बोरियाच्या जंगलात इंद्रावती नदीच्या पात्रात २२ एप्रिलला सी-६० पथकाने ४० जहाल नक्षलवाद्यांना ठार केले होते. त्यानंतर हे पथक चर्चेत आले आहे. १९८० ते  १९९० या दशकात नक्षलवाद्यांची प्रचंड दहशत या भागात होती. त्याला प्रतिबंध घालण्यासाठी १ डिसेंबर १९९० साली तत्कालीन पोलीस अधीक्षक के.पी.रघुवंशी यांनी सी-६० पथकाची स्थापना केली. त्यात जिल्हय़ाची भौगोलिक तथा भाषिक माहिती असलेल्या स्थानिक आदिवासी तरुणांना प्राधान्य देण्यात आले. त्याच्या परिणामी गडचिरोली पोलिसांना नक्षलवाद्यांची माहिती मिळणे अधिक सोपे झाले. नक्षल कारवायांत वाढ झाल्याने गडचिरोलीला उत्तर विभाग व दक्षिण विभाग अशा दोन विभागात विभाजन केले. दक्षिण भागात नक्षल कारवायांवर वाढ झाल्याने प्राणहिता उपमुख्यालय येथे १९९४ साली सी-६० च्या दुसऱ्या मुख्यालयाची स्थापना झाली.

सी-६० कमांडोला अतिशय खडतर प्रशिक्षणासाठी ग्रे हाऊन्स हैदराबाद, एन.एस.जी.मनेसर हरियाणा, हजारीबाग, कांकेर, यू.ओ.टी.सी नागपूर येथे पाठविले जाते. त्यामुळे सी-६० कमांडो हा अवघ्या काही मिनिटात तयार होऊन नक्षलवाद्यांसोबत लढण्यास तयार होतो. मात्र आता हेच प्रशिक्षण २०२० नंतर किटाळी येथे मिळणार आहे.

सध्या किटाळी येथे काही प्रमाणात सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात शारीरिकदृष्टय़ा सक्षम राहण्याकरिता दररोज सकाळी शारीरिक व्यायाम, कवायत व सांघिक खेळ घेतले जातात. तसेच त्यांना नक्षलविरोधी अभियान राबवण्यासाठी वेळोवेळी माहिती दिली जाते. आधुनिक सोयीसुविधांसाठी केंद्र व राज्य सरकार दरवर्षी ३ कोटीचा निधी देत आहे. ते २०२० पर्यंत तयार होईल. गडचिरोली, गोंदिया व चंद्रपूर या तीन जिल्हय़ांतील सी-६० कमांडोंना येथे प्रशिक्षण दिले जाईल.

पथकात ९०० कमांडो

पार्टी कमांडरच्या नावाने हे पथक ओळखले जाते. महत्त्वाचे म्हणजे सी-६० जवान अभियान राबविण्यासोबतच जनजागृतीची कामेही करतात. सध्या गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या विरोधात लढण्यासाठी एकूण २४ सी-६० पथके कार्यरत असून ९०० कमांडो या पथकात आहेत. स्थानिक पोलिसांना सोबत घेऊन जंगलात नक्षलवाद्यांविरुद्ध मोहिमेसाठी कमांडो अतिशय तरबेज आहेत.

२३० नक्षलवादी ठार

गडचिरोलीत सी-६० पथकाची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत २३० नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे. यामध्ये बोरिया-कसनासूर येथे झालेल्या चकमकीत सर्वाधिक ४० नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. यापूर्वी गोविंदगाव व कल्लेड या दोन चकमकीत अनुक्रमे ६ व ८ नक्षलवादी मारले गेले होते. तर नक्षलवाद्यांनी आजवर गडचिरोलीत ३८ वर्षांत ५३८ आदिवासींच्या हत्या केल्या. यामध्ये सरपंच, पोलीस पाटील, जिल्हा परिषद सदस्यापासून तर सामान्य आदिवासींचा समावेश आहे. तर १८० पोलीस नक्षलवाद्यांच्या भूसुरुंग स्फोट व चकमकीत शहीद झाले आहेत. यामध्ये सी-६० पथकातील ५९ जवानांचा समावेश आहे.

 

५० ते ७० किलोमीटर चालण्याची सवय

सी-६० पथकाचे नक्षल चकमकीत कमीत कमी नुकसान व्हावे यासाठीही कमांडोला विशेष प्रशिक्षण दिले जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जंगलात कमांडोंनी चार चाकी वाहनांचा वापर शक्यतो करूच नये असे आदेश आहेत. त्यामुळे जंगलात नक्षलविरोधी अभियानावर निघताना सलग तीन दिवस एलआरपी अर्थात लॉंग रूट प्रोसेसिंग राबविण्यात येते. यात सी-६० कमांडोला एका दिवसाला ५० ते ७० किलोमीटर अंतर चालावे लागते.

केंद्र व राज्य सरकारने सी-६० पथकाला सर्व प्रकारच्या प्रशिक्षणासाठी योजना मंजूर केली. त्यातून किटाळी येथे आधुनिक प्रशिक्षण केंद्र उभे राहत आहे. येत्या २०२० पर्यंत हे केंद्र पूर्णत्वाला येईल. सध्या कमांडरला हैदराबाद व ओरिया येथे प्रशिक्षणासाठी पाठविले जात आहे. भाविष्यात किटाळी येथेच प्रशिक्षण देण्यात येईल.

 अंकुश शिंदे, पोलीस, उपमहानिरीक्षक, गडचिरोली, गोंदिया

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra c 60 commando team appreciated central government
First published on: 22-08-2018 at 00:55 IST