राज्यातील सत्तास्थापनेला एका रात्रीत अचानक कलाटणी मिळाली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेत येईल असं वाटत असतानाच आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनामध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रावादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

“मला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे आभार मानायचे आहेत. त्यांनी राज्यामध्ये स्थिर सरकार देण्यासाठी पुढाकार घेत भाजपाबरोबर येण्याचा निर्णय घेतला. इतरही काही नेते आमच्यासोबत आले आहेत. त्यामुळे आम्ही सत्ता स्थापनेचा दावा केला आहे,” असं फडणवीस यांनी एनएनआयशी बोलताना म्हटलं आहे. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत राज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार सत्तेत येईल अशी चर्चा सुरु असतानाच अचानक आज राज्याच्या राजकारणामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. भाजपा आणि राष्ट्रवादीने एकत्र येत सरकार स्थापन केले आहे.

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनीही पहिली प्रतिक्रिया देताना शेतकऱ्यांचे आणि राज्यासमोरील इतर प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही एकत्र आल्याचे म्हटलं आहे.“निकालापासून ते आजच्या तारखेपर्यंत कोणत्याही पक्षाला राज्यामध्ये सत्तास्थापनेचा दावा करता आला नाही. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार येत असेल तर रस्ता काढण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आणि आम्ही सरकार स्थापन केलं,” असं अजित पवार यांनी एनएनआयशी बोलताना सांगितलं आहे. तसेच राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांच्या सत्तास्थापनेबद्दल बोलताना पवार यांनी हे सरकार स्थापन होणं कठीण वाटत होतं अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करणं कठीण वाटत होत,” असं अजित पवार म्हणाले.