‘वेदान्त फॉक्सकॉन’ आणि ‘टाटा एअरबस’ प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. एकीकडे विरोधक सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करत असताना दुसरीकडे हे प्रकल्प महाविकास आघाडीच्या कार्यकाळातच गेल्याचा दावा सरकार करत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत आयोजित रोजगार मेळाव्यात बोलताना यावर भाष्य केलं आहे. तसंच राज्यात अनेक नवे उद्योग आणत असल्याची माहिती दिली आहे.

“दोन-तीन प्रकल्प कुठे गेले हे आरटीआयमधून समोर आलं आहे. त्यातून सत्य समोर येईल. प्रकल्प का गेले? कोणामुळे गेले? कधी गेले? हे समोर येईल. उपमुख्यमंत्र्यांनीही पुराव्यानिशी मांडलं आहे,” असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसंच आम्ही नवे उद्योग आणत असून त्यात राज्याचं हित आहे. यामुळे राज्यातील तरुणांना फायदा होईल, राज्य स्वयंपूर्ण होईल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान मोदींकडून मोठी घोषणा! महाराष्ट्रासाठी २ लाख कोटींचे २२५ प्रकल्प मंजूर

“केंद्र सरकार राज्य सरकारच्या पाठीशी आहे. राज्याला केंद्राकडून विकासासाठी निधी मिळत आहे. गेल्यावेळी प्रस्ताव पाठवला असता १४ हजार कोटी मंजूर करण्यात आले. एक रुपयाही कमी केला नाही,” अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

“सरकार बदल्यानंतर चैतन्य आलं आहे. सर्व सण साजरे होत असून आनंदाचा शिधाही पोहोचला. पण काही ठिकाणी पोहोचला नाही म्हणून लगेच त्याच्यावर बोट ठेवण्यात आलं. राज्यात एक नकारात्मकपणा होता, त्यात सकारात्मकपणा आणला आहे. आम्ही दोघं असताना धडाधड निर्णय घेतले. हे गतिमान सरकार आहे,” असंही ते म्हणाले. “वर्षभरात ७५ हजार रिक्त पदं भरली जातील. नवीन उद्योग आणण्याचा प्रयत्न आहे,” असंही त्यांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“जपानच्या कंपनीने बीकेसीत २ हजार ६७ कोटींमध्ये जागा घेतली आहे. ते ५०० कोटी खर्च करणार आहेत. यामधून पाच ते सहा हजार लोकांना नोकऱ्या मिळतील,” अशी माहिती त्यांनी दिली. बीकेसीत विदेश गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे असंही त्यांनी सांगितलं.