चंद्रकांत पाटील यांची नुकतीच भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा सर्वांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या पाच कार्याध्यक्षांपैकी एक भाजपामध्ये सामिल झाल्यास आश्चर्य वाटालयला नको, असे विधान केले होते. त्यावर महाराष्ट्र प्रदेशचे कार्याध्यक्ष विश्वजित कदम यांनी प्रतिक्रिया देत चंद्रकांत पाटलांचे हे विधान हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे.

काँग्रेसच्या पाच कार्याध्यक्षांपैकी एखादा भाजपामध्ये सहभागी झाला तर आश्चर्य वाटायला नको, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते. प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी सर्वांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हे विधान केले. दरम्यान, प्रदेशाध्यक्षपदाला मी पद नाही तर जबाबदारी म्हणतो. तसेच आगामी निवडणुकांमध्ये राज्यात युतीची सत्ता आणण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. राज्यातील 227 जागांमध्ये युती पुढे आहे. ती संख्या वाढेल पण कमी होणार नाही. निवडणुकीचा निकाल ही केवळ औपचारिकता असल्याचे ते म्हणाले होते.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर विश्वजित कदम यांनी निशाणा साधला. चंद्रकांत पाटील हे सतत असे विधान करत असतात. ते एक ज्येष्ठ मंत्री आहेत. त्यांच्या खांद्यावर आता प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. ते सतत अशी विधाने का करतात हे त्यांनाच ठाऊक, असेही कदम म्हणाले. एबीपी माझाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. दरम्यान, आपण यापूर्वीच भूमिका स्पष्ट केली आहे. पतंगराव कदम यांनी पक्षात चार दशकं काढली. त्यामुळे यापुढेही आपण काँग्रेसच्या विचारांनीशीच काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.