महाराष्ट्रात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. राज्यात कोरोनाचे २२ नविन रुग्णांची नोंद झाली असून, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या २०३ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक १० रुग्ण मुंबईचे असून ५ रुग्ण पुण्याचे, ३ नागपूरचे, २ अहमदनगरचे तर सांगली, बुलढाणा आणि जळगाव येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. दरम्यान, करोना आजारातून बरे झालेल्या एकूण ३५ रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज राज्यात २ करोना बाधित रुग्णांचे मृत्यू झाले. एका ४० वर्षीय महिलेचा काल केईएम रुग्णालयात तीव्र श्वसनावरोधामुळे मृत्यू झाला होता. ती करोनाबाधित असल्याचे आज स्पष्ट झाले. तिला उच्च रक्तदाबही होता. बुलढाणा येथे एका ४५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू करोनामुळे झाला. तो मधुमेही होता. राज्यातील करोना बाधित एकूण मृत्यूची संख्या आता ८ झाली आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील :-
मुंबई – ८५
पुणे ( शहर व ग्रामीण भाग ) – ३७
सांगली – २५
मुंबई वगळून ठाणे मंडळातील इतर मनपा – २३
नागपूर – १४
यवतमाळ – ४
अहमदनगर – ५
सातारा – २
औरंगाबाद, रत्नागिरी,  सिंधुदुर्ग, कोल्हापूर, गोंदिया, जळगाव, बुलढाणा प्रत्येकी – १
इतर राज्य – गुजरात – १
एकूण – २०३

राज्यात आज एकूण ३९४ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ४,२१० जणांना भरती करण्यात आले. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ३,४५३ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २०३ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

आतापर्यंत ३५ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात १७ हजार १५१ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ९६० जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra coronavirus patients crossed two hundreds pkd
First published on: 29-03-2020 at 19:00 IST