राज्यातील शाळा उद्यापासून सुरू होत आहे. करोना वाढण्याची भीती असल्यानं काही शहरांत आणि जिल्ह्यांमध्ये शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावरून संभ्रम निर्माण झाला असून, विद्यार्थ्यांना संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या मुद्यावर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी माहिती देत “शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेत येण्याच सक्ती नसेल, विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण घेऊ शकतात,” असं स्पष्ट केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. उद्यापासून (२३ नोव्हेंबर) शाळा सुरू होत असून, शाळा सुरू करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाकडे देण्यात आलेले आहेत. यासंदर्भात उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंनी माध्यमांच्या प्रतिनिधी संवाद साधताना सविस्तर माहिती दिली. “सरकारने जबाबदारी घेऊनच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र एखाद्या ठिकाणी जास्त उद्रेक झाला, तर स्थानिक प्रशासनाला निर्णय घेण्यास सांगितलेलं आहे. शाळा सुरू करण्यासंदर्भात शिक्षण विभागाच्या सचिवांशी माझी चर्चा झाली आहे. मुलांना शाळेत पाठवणे सक्तीचे नसून, ऑनलाईन शिक्षण चालू राहिल,” अशी माहिती तनपुरे यांनी दिली.

मुंबई, ठाणे, पुण्यात शाळा बंदच राहणार

शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला असतानाच दुसरीकडे राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक शहरांमध्ये शाळा बंदच ठेवण्यात येणार आहेत. मुंबईतील वाढती करोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी काढले आहेत. त्याचबरोबर ठाणे आणि पनवेलमधील शाळाही बंद राहणार आहेत. ३१ डिसेंबरपर्यंत मुंबई, ठाणे, पनवेलमधील शाळा बंदच ठेवण्यात येणार आहेत. पुण्यातील शाळाही १३ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यांची माहिती दिली. १३ डिसेंबरला करोना स्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेणार असल्याचं ते म्हणाले. औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारपासून (२३ नोव्हेंबर) शाळा सुरु होणार आहेत. मात्र महापालिका क्षेत्रातील शाळा ३ जानेवारीपर्यंत बंदच ठेवण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनी याची माहिती दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra coronavirus update school reopening prajakta tanpure state minister bmh
First published on: 22-11-2020 at 09:02 IST