मुंबई : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत तीन हजार ९०९ किमीच्या रस्त्यांचा दर्जा वाढविण्यासाठी व ते अधिक चांगले करण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून ३१० दशलक्ष डॉलर कर्ज घेण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी मान्यता देण्यात आली. मुंबई मेट्रो तीनची सेवा लवकर सुरू करण्यासाठी राज्य शासनाच्या हिश्शाची रक्कम मुंबई मेट्रो कॉर्पोरेशनला देण्यासही मंजुरी देण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी निधीची मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्याच्या अनेक प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे.

हेही वाचा >>> Maharashtra MLC Polls : कोकण पदवीधर मतदारसंघासाठी सुमारे ७० टक्के मतदान

विधिमंडळ अधिवेशन पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले आहेत. पुणे रिंग रोड, विरार ते अलिबाग कॉरिडॉर प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी हुडकोकडून कर्ज घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. विधवा महिलांना वारसा प्रमाणपत्र देण्यासाठी ७५ हजार रुपयांऐवजी १० हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या मुंबईतील इमारतीसाठी १८४ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. चंद्रपूर कॅन्सर केअर फाऊंडेशनला भाडेपट्ट्यावरील मुद्रांक शुल्कात सूट देण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.