महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यांची प्रकृती आता बरी असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. करोनाची लागण झाल्यामुळे कोश्यारी यांना मुंबईतील रिलाईन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते राजभवनात जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

गेल्या सहा दिवसांपासून महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे शिवसेनेत उभी फळी निर्माण झाली आहे. ४० पेक्षा जास्त आमदारांचा शिंदेना पाठिंबा असल्यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. एकीकडे शिवसेनेने १६ आमदारांना नोटीसा पाठवत आमदारकी रद्द होण्याची धमकी दिली आहे. तर दुसरीकडे शिंदे गट वेगळा पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. यासाठी हालचालीही सुरु झाल्या असून शिंदे गटाकडून ‘बाळासाहेब शिवसेना’ हे नाव सूचवण्यात आले आहे. मात्र, शिवसेनेने या नावावर आक्षेप घेतला आहे. गद्दारांनी बाळासाहेबांचे नाव वापरु नये, असा इशारा बंडखोर आमदारांना देण्यात आला आहे.

सत्ता स्थापनेच्या हलचालींना वेग

महाराष्ट्राच्या या राजकीय घडामोडींमध्ये राज्यपालांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. भाजपा एकनाथ शिंदे गटासोबत राज्यपालांकडे सत्ता स्थापनेसाठी दावा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काल बडोद्यात एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत सत्ता स्थापनेच्या अनुशंगाने चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

शिवसेनेची वेट अँड वॉचची भूमिका
महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेल्या या पेचावर तोडगा काढण्यासाठी शिवसेनेच्या पक्षकार्यकारणीची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थि होते. बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांची पक्षनेते पदावरून हकालपट्टी करण्यात येईल, अशी चर्चा सगळीकडे होती. मात्र, अद्याप एकनाथ शिंदेंवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नसून त्यांचे पक्षनेते पद कायम ठेवली असल्याची माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली. तसेच शिवसेना सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचेही राऊतांनी स्पष्ट केले.