अयोध्या (उत्तर प्रदेश) येथे नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिरात २२ जानेवारी रोजी श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. हा दिवस अवघ्या देशभरातील नागरिकांसाठी महत्त्वाचा दिवस असणार आहे. महाराष्ट्र सरकार हा दिवस आणखी खास करणार आहे. २२ जानेवारी रोजी देशभर दिवाळी साजरी करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील जनतेला राज्य सरकारने आनंदाचा शिधा देण्याचं ठरवलं आहे. राज्य मंत्रिमंडळाची बुधवारी (१० जानेवारी) बैठक झाली. या बैठकीत यासंदर्भातला निर्णय घेण्यात आला आहे. यासह राज्य सरकारने इतर आठ महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, राज्य सरकारची जनतेला आनंददायी भेट. महाराष्ट्रातील महायुती सरकारने आज सर्वसामान्य नागरिकांना आनंदाची भेट जाहीर केली. प्रभू श्रीरामाच्या २२ जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांनाही आनंदाचा शिधा दिला जाणार आहे.
हे ही वाचा >> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दशक्रियेचे आमंत्रण, संत्री उत्पादक शेतकऱ्याने केली होती आत्महत्या
राज्य मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय
- राज्यात नागरी भागातील अतितीव्र कुपोषित (SAM) बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यास मान्यता.
- ग्रामविकास विभागातील योजनांच्या जाहिरात आणि प्रसिद्धीसाठी नवीन लेखाशिर्ष उघडण्यास मंजुरी.
- ‘सत्यशोधक’ मराठी चित्रपटास आकारल्या जाणाऱ्या राज्य वस्तू व सेवा कराच्या प्रतिपूर्तीस मंजुरी.
- जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, विरार या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना आणि सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करण्यास मंजुरी.
- पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठीच्या अनुदानात ५० हजार रुपयांवरून एक लाख रुपयांपर्यंत वाढ.
- महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ लागू असलेल्या पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित परिमंडळातील गावठाणामधून स्थलांतरित न झालेल्या प्रकल्पग्रस्तांना नवीन पुनर्वसित गावठाणाऐवजी रोख रक्कम स्वरुपात आर्थिक पॅकेज देणार.
- श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पात्र शिधापत्रिकाधारकांना प्रति शिधापत्रिका आनंदाचा शिधा देण्यास मंजुरी.
- राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांची अतिरिक्त २,८६३ आणि सहाय्यभूत ११,०६४ पदे निर्माण करण्यास तसेच ५,८०३ पदे बाहययंत्रणेद्वारे उपलब्ध करुन घेण्यास मंजुरी.