Maharashtra HSC Result 2021 : आता प्रवेशाची परीक्षा!

बारावीत ९१ हजार ४२० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण

बारावीत ९१ हजार ४२० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण

मुंबई : अंतर्गत मूल्यमापनामुळे यंदा दहावीपाठोपाठ बारावीचाही निकाल घसघशीत लागला. राज्याचा बारावीचा निकाल ९९.६३ टक्के  लागला असून, ९१ हजार ४२० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले. या फुगलेल्या निकालाने राज्यातील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या गोंधळाची पायाभरणी केल्याचे दिसत असून, अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवताना विद्यार्थ्यांची कसोटी लागणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल दहावी, अकरावीमध्ये मिळालेले सरासरी गुण आणि बारावीचे अंतर्गत मूल्यमापन याआधारे जाहीर करण्यात आला. निकालाची टक्केवारी जवळपास साडेआठ टक्क्य़ांनी वाढली असून, १३ लाख १४ हजार ९६५ नियमित विद्यार्थी उच्चशिक्षण संस्थांच्या उंबऱ्यावर प्रवेशासाठी दाखल झाले आहेत. यंदा नियमित विद्यार्थ्यांप्रमाणेच पुनर्परीक्षार्थीचे उत्तीर्णतेचे प्रमाणही वाढले असून, ६३ हजार ६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर साधारण २६ हजार ३०० खासगीरित्या प्रविष्ट झालेले विद्यार्थी प्रवेशाच्या रांगेत आहेत.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ९० टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या संख्या (९१ हजार ४२०)अधिक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत साधारण ८४ हजारांनी ही संख्या वाढली आहे. त्यामुळे पदवी प्रवेशांच्या अटीतटीला विद्यार्थ्यांना तोंड द्यावे (पान ९ वर) (पान १ वरून) लागणार आहे. विशेषत: मुंबई, पुणे, नागपूर विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये, नामवंत संस्थांमध्ये पारंपरिक किंवा स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळवणे कठीण होणार आहे.

प्रवेशाची स्थिती

राज्यातील साधारण साडेचौदा लाख विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत. त्यात इतर मंडळांतील प्रवेशपात्र विद्यार्थी, परराज्यांतून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचीही भार पडेल. यापैकी वैद्यकीय, वैद्यकीय पूरक, परिचर्या, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, बारावीनंतरचा विधि अभ्याससक्रम, शिक्षणशास्त्र, व्यवस्थापन पदवी, हॉटेल व्यवस्थापन पदवी, कृषी यांसह इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या जागा या साधारण साडेचार ते पाच लाखांच्या घरात असल्याचे दिसते. त्यानुसार जवळपास १० लाख विद्यार्थी पारंपरिक विद्याशाखांसाठी प्रवेश घेण्याच्या स्पर्धेत असणार आहेत. ९० टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने महाविद्यालयांच्या प्रवेश पात्रता गुणांमध्येही जवळपास ५ ते १० टक्क्य़ांची वाढ होऊ शकेल, असे मुंबईतील एका महाविद्यालयाच्या प्राचार्यानी सांगितले.

शाखानिहाय निकाल

विज्ञान – ९९.४५%

कला – ९९.८३%

वाणिज्य – ९९.९१%

व्यवसाय अभ्यासक्रम – ९८.८०%

विभागीय निकाल

पुणे – ९९.७५%

नागपूर – ९९.६२%

औरंगाबाद – ९९.३४%

मुंबई – ९९.७९%

कोल्हापूर – ९९.६७%

अमरावती – ९९.३७%

नाशिक – ९९.६१%

लातूर – ९९.६५%

कोकण – ९९.८१%

वाणिज्य, कला विद्यार्थ्यांपुढे मोठे आव्हान

विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचे व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याचे प्रमाण तुलनेने अधिक असते. त्यामुळे या शाखेतील काही जागा महाविद्यालयांमध्ये रिक्त होतात. वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थी हे पारंपरिक किंवा स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. यंदा बहुतेक सर्व कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के  लागला आहे. नामवंत महाविद्यालयांमध्ये त्यांच्याकडील बारावीच्या विद्यार्थ्यांनी पदवीसाठी प्रवेश कायम केल्यास विद्यार्थ्यांना नव्याने प्रवेश मिळणे यंदा कठीण होणार असल्याचे दिसते. कला शाखेचे सर्व विषय सर्व महाविद्यालयांमध्ये नसतात. त्यामुळे हवा तो विषय असलेल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवणेही विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. आमच्याकडील बारावीचे बहुतेक विद्यार्थी पदवीसाठी प्रवेश निश्चित करतात. त्यामुळे यंदा अगदी मोजके च प्रवेश महाविद्यालयांमध्ये उपलब्ध होऊ शकतील, असे मुंबईतील एका नामवंत महाविद्यालयाच्या प्राचार्यानी सांगितले.

प्रवेश परीक्षा अशक्य?

अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीही अकरावीप्रमाणेच सामाईक प्रवेश परीक्षा घेण्याची चर्चा विद्यापीठांमध्ये सुरू होती. मात्र, अद्यापही त्याबाबत काहीच ठोस निर्णय झालेला नाही. आता प्रवेश परीक्षा घ्यायची झाल्यास त्याची प्रक्रिया कधी राबवणार आणि परीक्षा घेऊन प्रवेश कधी करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ही परीक्षा होण्याची शक्यता नसल्याचे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maharashtra hsc result 2021 99 63 percent students passed hsc exams in maharashtra zws