चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांचा आजचा नियोजित बेळगावचा दौरा महाराष्ट्र सरकारला रद्द करून तो लांबणीवर टाकावा लागला आहे. यामुळे विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकारपरिषद हा दौरा रद्द झाला नाही तर पुढे ढकलावा लागण्या मागचं कारण सांगितलं.

मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, “आम्ही आज(६ डिसेंबर) बेळगावला जाणार होतो. हा माझा आणि चंद्रकांत पाटील यांचा पूर्वनियोजित दौरा होता. अधिकृतरित्या आमच्या सरकारने कर्नाटक सरकारला ही माहिती दिली होती, की आमचे दोन मंत्री बेळगावत येत आहेत. आम्ही अगोदर ३ डिसेंबर रोजी जाणार होतो, परंतु जे मराठी भाषिक लोक बेळगावात आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की, ६ डिसेंबर रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी आपल्या मराठी भाषिकांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तुम्ही यामध्ये सहभागी व्हावे, अशी त्यांनी आम्हाला विनंती केल्याने आम्ही ३ ऐवजी ६ डिसेंबरला जाण्याचे ठरवले होते. कालपर्यंत आमचा दौरा निश्चित होता. मात्र आमच्या पूर्ण दौऱ्याला कर्नाटक सरकारने वेगळं वळण दिले. त्यांनी असं सांगितलं की तिथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि आम्ही तिथे जाऊ नये म्हणून त्यांच्या सरकारच्या मुख्यसचिवांनी महाराष्ट्र सरकारलाही अधिकृतरित्याही कळवलं होतं. परंतु तरी आम्ही जाण्याची नियोजन केलं होतं.”

याचबरोबर, “मात्र आपल्या कोल्हापूर जवळ जे कोगनोळी चेकपोस्ट आहे जिथून रस्तामार्गे कर्नाटकचे हद्द सुरू होते. तिथे त्यांनी प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त लावला आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी काल हेदेखील सांगितलं की, कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रातील मंत्र्यांना आम्ही बेळगावत येऊ देणार नाही. वास्तविक पाहता कर्नाटक सरकारची ही भूमिका अतिशय चुकीची आहे. कारण या स्वतंत्र भारतात कोणतीही सामान्य व्यक्ती कुठेही येऊ जाऊ शकते.” असं शंभूराज देसाई म्हणाले.

हेही वाचा – “…तर सरकार चालवण्याची जबाबदारी मी घ्यायला तयार” ; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय, “परंतु जेव्हा याला वेगळं वळण कर्नाटक सरकराने लावलं आणि आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे. आम्ही हा दौरा रद्द केलेला नाही, हा दौरा आम्ही केवळ पुढे ढकलला आहे. बेळगावात जायचं तिथल्या लोकांना भेटायचं, हे तर आमच्या अजेंड्यावर आहेच. परंतु आजच्या दिवशी जात असताना, या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यस्मरणाच्या अभिवादन कार्यक्रमास गालबोट लागू नये. तिथल्या सर्व लोकांच्या किंवा सर्व समाजाच्या भावनांना ठेच पोहचू नये, या उद्देशानेच आम्ही दौरा पुढे ढकलेला आहे. लवकरच मी आणि चंद्रकांत पाटील याबाबत चर्चा करू आणि आम्ही या दौऱ्याला निश्चितपणे जाऊ.” असं शेवटी शंभूराज देसाई यांनी सांगितलं.