Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2018 LIVE UPDATES: मार्चमध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज (शुक्रवार, ८ जून) दुपारी १ वाजता जाहीर झाला आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा लवकर निकाल जाहीर होत असून उद्यापासून (९ जून) विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि उत्तर पत्रिकांच्या छायाप्रतींसाठी अर्ज करता येईल. राज्याचा निकाल ८९. ४१ टक्के लागला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात अर्धा टक्क्याने वाढ झाली आहे. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला असून कोकणातील ९६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा नऊ मंडळांमार्फत मार्च २०१८ मध्ये दहावीची परीक्षा घेण्यात आली होती.  परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या किंवा श्रेणी सुधारण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना जुलैमध्ये फेरपरीक्षेची संधी मिळणार आहे.

Maharashtra SSC 10th Result 2018 LIVE UPDATES,Follow Live Updates in Hindi and English

01:42PM: लातूरची पोरं हुश्शार! ७० विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण, राज्यातील एकूण १२५  विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण

01:38PM कोल्हापूर विभागीय मंडळाचा निकाल ९३. ८८ टक्के, विभागात कोल्हापूर जिल्हा अव्वल, कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल ९५.३५ टक्के, सातारा जिल्हा विभागात दुसरा, सातारा जिल्ह्याचा निकाल ९३.४३ टक्के

01:30PM: दहावीच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्या शुभेच्छा

01:23PM: www.sscresult.mkcl.org या वेबसाईटला भेट द्या. तुमचा आसन क्रमांक आणि आईचे नाव टाकून निकाल पाहा.

01:19PM: बोर्डाच्या निकालाच्या वेबसाईटवरील युजर्सची संख्या वाढल्याने काही ठिकाणी निकाल बघताना अडचणी, विद्यार्थी आणि पालकांची तक्रार

01:15PM: राज्यात ३३ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला. यात सर्वाधिक म्हणजेच ९ शाळा औरंगाबाद विभागातील आहेत. तर लातूरमधील सहा शाळांचा यात समावेश आहे.

01: 09PM: दहावीचा निकाल ऑनलाइन जाहीर, www.mahresult.nic.in , www.sscresult.mkcl.org ,  http://www.maharashtraeducation.com  या वेबसाईटवर  बघा निकाल.

11: 53AM: राज्यातील नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ४ लाख ३ हजार १३७ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, ५ लाख ३८ हजार ८९० विद्यार्थी  प्रथमश्रेणीत, ४ लाख १४ हजार ९१४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, ९९ हजार २६२ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

11: 50AM: दहावी, बारावीची फेरपरीक्षा १७ जुलैला होणार. अनुत्तीर्ण विद्यार्थी आणि श्रेणी सुधारण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी यंदा एकत्रच फेरपरीक्षा 

11:48 AM: राज्यातील ९ विभागीय मंडळांमधून एकूण १ लाख १३ हजार ०७८ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी होते. यातील ४९ हजार २३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.  त्यांची एकूण निकालाची टक्केवारी ४३. ५४ टक्के आहे.

11:46 AM:  यंदा एकूण ५७ विषयांची परीक्षा घेण्यात आली. यातील ११ विषयांचा निकाल १०० टक्के लागला.

11:44 AM: गुणपत्रिका मिळण्याची तारीख दोन दिवसात जाहीर करणार, शकुंतला काळे यांची पत्रकार परिषदेत माहिती.

11:28 AM: या वर्षी राज्यातील २१ हजार ९५७ शाळांपैकी ४, ०२८ शाळांचा निकाल १०० टक्के लागला.

11:27 AM: दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ८६. ८७ टक्के लागला आहे.

11:24 AM: दहावीच्या परीक्षेत यंदाही मुलींची बाजी. परीक्षेत एकूण ९१.९७ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून मुलांचा निकाल ८७.२७ टक्के इतका आहे.

11:22 AM: निकालाची विभागीय टक्केवारी
१) कोकण : ९६.०० टक्के
२) कोल्हापूर : ९३.८८ टक्के
३) पुणे : ९२.०८ टक्के
४) मुंबई : ९०.४१ टक्के
५) औरंगाबाद : ८८.८१ टक्के
६) नाशिक : ८७.४२ टक्के
७) अमरावती : ८६.४९ टक्के
८) लातूर : ८६.३० टक्के
९) नागपूर : ८५.९७ टक्के

11:17 AM: पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकणमधून एकूण १६ लाख २८ हजार ६१३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील १४ लाख ५६ हजार २०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

11:13 AM: राज्याचा निकाल ८९. ४१ टक्के, सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा, कोकणातील ९६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा.  नागपूरमधील ८५. ९७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण.

11:12 AM: राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे पत्रकार परिषदेत निकालाची माहिती देताना

11:10 AM: बोर्डाच्या पत्रकार परिषदेला सुरुवात

11:06 AM: या वेबसाईट्सवर निकाल बघता येणार

 

10:58AM: www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर दहावीचा निकाल बघता येईल.

10:46 AM: गेल्या वर्षी राज्यातील २१ हजार ६८४ शाळांपैकी ३२ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला होता. तर ३ हजार ६७६ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला होता.

10:27 AM: २०१७ मध्ये देखील मुलींनीच दहावीच्या परीक्षेत बाजी मारली होती. गेल्या वर्षी एकूण १६ लाख ४४ हजार ०१६ विद्यार्थी परीक्षेला बसले हते. यातील मुलींचा निकाल ९१. ४६ टक्के तर मुलांचा निकाल ८६. ५९ टक्के इतका होता. या वर्षी देखील ही परंपरा कायम राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

10: 20 AM: गेल्या वर्षीदेखील कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक होता. कोकण विभागाचा निकाल ९६. १८ टक्के इतका होता. तर कोल्हापूर (९३. ५९ टक्के), पुणे(९१. ९५ टक्के), मुंबई (९०.०९ टक्के), औरंगाबाद (८८.१५ टक्के), नाशिक (८७.७६ टक्के), लातूर (८५. २२ टक्के), अमरावती (८४.३५ टक्के), नागपूर (८३.६७ टक्के) इतका निकाल लागला होता.

10:16 AM: गेल्या वर्षी राज्यातून ८८. ७४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यात तब्बल १९३ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी म्हणजेच १०० टक्के गुण मिळाले होते.

10:10 AM: दहावीचा निकाल एसएमएसवरही उपलब्ध असेल. बीएसएनएलच्या मोबाइल ग्राहकांनी MHSSC टाईप करुन स्पेस द्यावा यानंतर आसनक्रमांक टाईप करावा आणि ५७७६६ या क्रमांकावर पाठवावा.

10:04 AM: ९ जूनपासून गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करता येतील. यासाठी आवश्यक त्या अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

09:57 AM: http://www.mahresult.nic.in , www.sscresult.mkcl.org ,  http://www.maharashtraeducation.com या तीन वेबसाईट्सवर निकाल बघता येईल.

09:51 AM: गेल्या वर्षी दहावीचा निकाल १३ जूनला जाहीर करण्यात आला होता. त्यापूर्वी २०१६ मध्ये ९ जून, तर २०१५ मध्येही ८ जूनलाच निकाल जाहीर झाला होता. या पार्श्वभूमीवर, यंदा तुलनेत लवकरच निकाल जाहीर होत आहे.

09:49 AM: राज्यातील सुमारे १८ लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे.

09:45 AM: सकाळी अकरा वाजता बोर्डाची पत्रकार परिषद

बोर्डाने दिलेल्या संकेतस्थळावर भेट द्यावी. तिथे तुमचा क्रमांक कोणत्याही स्पेसशिवाय टाईप करा. यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावीत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra msbshse ssc 10th result 2018 live updates mahresult nic in mumbai pune konkan
First published on: 08-06-2018 at 09:45 IST