Maharashtra Mumbai News Today : अलिकडेच राज्यात झालेल्या दंगलींमुळे राजकीय वातावरण तापलेलं असताना रविवारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यादरम्यान अनुचित प्रकार घडला. यावेळी पोलिसांनी काही वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार केला असून या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. यामुळे राजकीय वातावण आणखी तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक यावरून एकमेकांना लक्ष्य करत आहेत. तसेच शिवसेनेच्या ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत बाबींवर भाष्य करण्यात आलं आहे. दंगली, पलखी सोहळ्यारम्यान वारकऱ्यांवर झालेला लाठीहल्ला आणि सामनाचा अग्रलेख या सर्व प्रकरणांवर आज दिवसभरात राजकीय घडामोडी पाहायला मिळतील.
Mumbai Maharashtra News Today : राजकीय बातम्यांचा आढावा
अमरावती: मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव विभागातील माताकोल संरक्षण कॅम्पनजीक कारा येथील एका युवकावर वाघाने हल्ला केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या युवकाला वाघाने फरफटत दरीत ओढून नेले.
नागपूर: पावसाळापूर्व करावयाच्या कामाचा एक भाग म्हणून रस्त्यालगत असलेल्या झाडांच्या फांद्याची कापणी केली जाते. मात्र त्याचा कचरा वेळीच उचलला जात नसल्याने त्याचा त्रास परिसरात राहणाऱ्या लोकांना व रस्त्यावरून जाणाऱ्यांना नागरिकांना सहन करावा लागतो.
पुणे: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (विद्या प्राधिकरण) डी.एल.एड अभ्यासक्रमाची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार १३ ते २७ जून या कालावधीत अर्ज भरता येणार असून, पहिली अंतिम गुणवत्ता यादी ५ जुलैला जाहीर करण्यात येणार आहे.
राज्य शासनाच्या सेवेतील उपायुक्त उमाकांत गायकवाड आणि उमेश बिरारी यांची ठाणे महापालिकेत प्रतिनियुक्ती करण्यात आली असून हे दोन्ही अधिकारी महापालिकेत रूजू झाले आहेत. सविस्तर वाचा…
नागपूर : विरोधी पक्षांच्या नेत्यांबद्दल द्वेष आणि घृणा निर्माण होईल, अशा प्रकारे कार्यकर्त्यांची जडणघडण होत आहे की काय, असा प्रश्न उपस्थित व्हावा, अशी स्थिती निर्माण झाली आहे. राजकीय नेत्यांच्या वक्तव्याने हे कार्यकर्ते भडकतात आणि टोकाचे पाऊल उचलतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ठार मारण्याची मिळालेली धमकी हा त्याचाच परिपाक आहे. पण, शरद पवार यांच्या बाबत २०११ मध्ये धमकी नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीच घडली. जाणून घ्या त्या दिवशी नेमके काय घडले.
नागपूर : महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पात प्रस्तावित ६६० ‘मेगावॅट’चे दोन संच, अशा एकूण १ हजार ३२० मेगावॅटच्या प्रकल्पाविरोधात ‘जय विदर्भ पार्टी’ आता मैदानात उतरली आहे. पक्षाकडून १३ जून ते १९ जून २०२३ पर्यंत नागपुरातील संविधान चौकात साखळी उपोषणाची घोषणा करण्यात आली आहे.
उरण : जेएनपीटी बंदरावर आधारीत सेझमध्ये सावरखार गावातील भूमिपुत्र तरुणांना नोकरीत प्राधान्य द्या या प्रमुख मागणीसाठी सोमवारपासून गावातील तरुणांनी सेझ प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाची दखल न घेतल्यास सेझ प्रकल्पाचे प्रवेशद्वार बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नवी मुंबई : वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात में अखेर कोकणातील हापूसचा हंगाम संपताच जूनच्या सुरुवातीलाच जुन्नर हापूसच्या हंगामाला सुरुवात होते. बाजारात आता आवक वाढली असून ७ हजार ते ८ हजार पेट्या दाखल होत असून, प्रति डझन ३५० ते ७०० रुपयांनी विक्री होत आहे. जून अखेरपर्यंत जुन्नर हापूस हंगाम सुरू राहील, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.
बिपरजॉय चक्रीवादळाचा फटका मुंबई आणि गुजरातच्या किनाऱ्याला बसला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीची बैठक बोलावून चक्रीवादळासंबंधी माहितीचा आढावा घेतला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक नेते आणि अधिकारी उपस्थित होते.
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील वाढत्या संवादामुळे राज्यात नव्या राजकीय समिकरणांची चर्चा एकीकडे जोरात असतानाच मनसेचे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील एकमेव आमदार राजू पाटील यांची मात्र कोंडी करण्याची व्युहरचना शिंदे यांच्या गोटात आखली जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
पिंपरी: उद्योगनगरीचा पाहुणचार घेऊन श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सोमवारी पुण्याकडे मार्गस्थ झाला. पिंपरी-चिंचवडकरांनी भक्तिभावाने पालखीला निरोप दिला. पहाटेपासूनच नागरिक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर दुतर्फा थांबलेले होते. पालखीचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
वाहनचोरीच्या आठ घटना खांदेश्वर, खारघर, कामोठे व तळोजा या परिसरात घडल्याची नोंद विविध पोलीस ठाण्यात झाली आहे. यामुळे वाहनचोरी रोखण्यासाठी पोलीस आयुक्त काय उपाययोजना करतात याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागून राहिले आहे. सविस्तर वाचा…
येथील पश्चिम भागातील महात्मा फुले रस्त्यावरील गणेश चौक आणि माॅनजिनीज चौक येथे सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत वाहतूक पोलीस तैनात करण्याची मागणी रिक्षा चालक मालक संघटनेचे कार्याध्यक्ष अंकुश म्हात्रे यांनी डोंबिवली वाहतूक विभागाकडे केली आहे.
सध्या उष्णतेने जळगावकर हैराण झाले असून, मान्सूनच्या प्रतीक्षेत असणार्या जिल्ह्यातील अनेक भागांत टंचाईची बिकट स्थिती झाली आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यातील २५ गावांना २८ टँकर सुरू असून, ७२ गावांसाठी ७६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
अमरावती : परतवाडा ते धारणी राज्य महामार्गावर अमरावतीहून मध्यप्रदेशातील खंडवा येथे जाणारी एसटी बस मेळघाटातील घटांग नजीक अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला दहा ते बारा फूट दरीत उलटली. ही बस झाडांना अडकल्याने मोठा अपघात टळला. या अपघातात बसचालकासह ७ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. बसचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
अंगाची लाही लाही करणारा उन्हाळा थंड पेयं पिण्यास भाग पाडतो. पावले आईस्क्रीम पार्लरकडे धाव घेतात. पण खात्रीचे असेल तर बरे अन्यथा भलतेच व्हायचे. येथील स्टेशन फैल भागात राहणारे कुणाल पाली हे मुलांच्या आग्रहास्तव एका आईस्क्रीम दुकानात पोहचले. तीन फ्रूट सॅलेड घेवून घरी आले. सविस्तर वाचा…
सीबीडी येथील पडीक इमारतीच्या पाचव्या माळ्यावरून पडून मृत्युमुखी पडलेल्या युवतीच्या मित्राला एनआरआय पोलिसांनी अटक केली आहे. सुरुवातीला या घटनेची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली होती. नातेवाईकांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी एनआरआय पोलिसांकडे केली होती. सविस्तर वाचा…
येथील एका महाविद्यालयात आयोजित करिअर मार्गदर्शन मेळाव्याच्या नावाखाली मुस्लिम धर्माचा प्रचार करण्याचा कथित प्रयत्न झाल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी त्यास तीव्र आक्षेप घेतला. यामुळे शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी येथील कॅम्प पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. सविस्तर वाचा…
आठवडा झाला कोल्हापूरातील वातावरण बिघडलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना कधी मुस्लिमांबद्दल आकस नव्हता. तसेच मुस्लिम समाजालाही त्यांच्याबद्दल कधीच मनामध्ये आकस राहिलेला नाही. गोविंद पानसरेंच्या ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकात लिहिलं आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहिला तर जीवाची बाजी लावून महाराजांची आग्र्याहून सुटका करणारे मदारी मेहतर असो किंवा अन्य २२ वतनदार असो वा सैन्याचे प्रमुख असो या सर्व विश्वासूंशिवाय महाराज स्वराज्याची लढाई लढू शकले नसते. इतके सैन्य प्रमुख मुस्लिम असतील तर त्यामध्ये मावळे किती मुस्लिम असतील? या मावळ्यांसोबत शिवाजी महाराजांची औरंगजेबाच्या सैन्याशी लढाई केली. त्यामुळे औरंगजेब आपला होऊच शकत नाही, असे स्पष्ट मत माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
मुंबईः धारावी येथे ५९ वर्षीय व्यक्तीची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. मृत व्यक्तीचा मोबाईल, घड्याळ व अंगठी गायब असून याप्रकरणी शाहू नगर पोलिसांनी जबरी चोरी व हत्येचे गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी २६ वर्षीय तरूणाला पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई: राज्य परिवहन (एसटी) महामंडळामधील नव्या हिरकणीची सेवा ‘स्वारगेट – मंत्रालय’ या प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या मार्गावरून सोमवारपासून सुरू झाली आहे. पुणे विभागातील दोन नव्या हिरकणीची सेवा ‘स्वारगेट – मंत्रालय’ या मार्गावर चालवण्यास सुरुवात झाली आहे.
गोंदिया : अवैध गौणखनिजाची वाहतूक करणाऱ्या आरोपींनी आमगाव पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या घटनेमुळे जेथे पोलीसच सुरक्षित नाही तिथे सामान्यांचं काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही घटना रविवारी रात्री आमगाव तालुक्यातील भोसा येथे घडली. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
वर्धा: औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील म्हणजेच आयटीआयचे प्रवेश अर्ज ऑनलाईन स्वीकारणे सुरू झाले आहे. प्रवेश प्रक्रियेत चार मुख्य फेऱ्यांसह एक समुपदेशन व एक खासगी संस्थास्तरीय, अशा एकूण सहा फेऱ्या राहणार आहेत.
कोल्हापूर : ‘शासन आपल्या दारी’ या राज्यशासनाच्या महत्त्वपूर्ण उपक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी कोल्हापुरात येत असताना विकासकामे, टक्केवारी वरून शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटातील वाद उफाळला आहे.
जळगाव – घसरत्या दरामुळे निर्माण झालेली कापूसकोंडी आणि स्वत:च्या मतदारसंघातच निर्माण झालेली पाणी टंचाई स्वत: पाणी पुरवठा मंत्री असतानाही दूर करण्यात आलेले अपयश, यामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील या विषयावर मौन बाळगून आहेत. स्वतःला पाणीवाले बाबा म्हणवून घेणाऱ्या गुलाबरावांना बळीराजाच्या प्रश्नांविषयी गांभीर्य किती, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून उपस्थित होत आहे.
आळंदीमध्ये वारकरी लाठीमार प्रकरण ताजे असतांना आता या ठिकाणचा आणखी व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये पोलीसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असतांनाही काही तरुण वारकरी हे नियम डावलून पोलिसांना धक्काबुक्की करत, मागे ढकलत आणि त्यानंतर पोलीसांना तुडवत मंदिराच्या दिशेने धावत असल्याचं पाहायला मिळत आहे.
कल्याण: येथील पूर्व भागातील काटेमानिवली मध्ये एका तरुणाची याच भागातील एका युवकाने पूर्ववैमनस्यातून धारधार चाकुचे वार करुन निर्घृण हत्या केली. रविवारी रात्री हा प्रकार घडला.
पुणे: खडकवासला परिसरातील कालव्यात पोहण्यासाठी गेलेला तरुण बुडाल्याची घटना घडली. गेल्या महिनाभरात कालव्यात बुडून तीन जण मृत्युमुखी पडले आहेत.
वाई: पुणे बंगळुरू महामार्गावर आनेवाडी टोल नाक्याजवळ असणाऱ्या उड्डाण पुलावर साताऱ्यातून पुण्याकडे जाणाऱ्या विठाई बसने अचानक पेट घेतल्याने फक्त वीस मिनिटात संपूर्ण बस जळून खाक झाली. चालक वाहकाने प्रसंगावधान दाखविल्याने सर्व प्रवासी बसमधून सुखरूप उतरल्याने जिवीत हानी झाली नाही. मात्र बस पूर्ण जळून खाक झाली.
यवतमाळ : गेल्यावर्षी महाराष्ट्रात ज्या राजकीय घडामोडी घडल्या त्या बेकायदेशीर होत्या. शिवसेनेतील बंडानंतर तत्कालीन विरोधी पक्षनेते फडणवीस यांना निमंत्रित करून थेट सरकार स्थापन करण्यात आले. ही बाबही बेकायदेशीर असेल तर सत्तास्थापनेची घटना बरोबर कशी, असा प्रश्न करीत सत्तास्थापनेच्या निकालात सर्वोच्च न्यायालयाची न्यायिक चूक झाल्याचे परखड मत संविधान तज्ज्ञ ॲड. असीम सरोदे यांनी मांडले.
उद्धव ठाकरे - अजित पवार
"…म्हणून शरद पवारांनी फेरबदल केले"; ठाकरे गटाने 'सामना'तून व्यक्त केला तर्क
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय दर्जा गमावला आहे. नागालॅण्डमध्ये त्यांचे चार-पाच आमदार निवडून आलेत. राज्याबाहेर लक्षद्वीप येथे त्यांचा एक खासदार आहे. केरळ विधानसभेत त्यांचे एक-दोन सदस्य आहेत. बाकी सर्व कारभार महाराष्ट्रात आहे. त्यामुळे सर्व काही आटोपशीर आहे. मग एकाच वेळी दोन कार्यकारी अध्यक्ष नेमण्याची गरज का पडली? हाच काय तो प्रश्न आहे”, असा मुद्दा ठाकरे गटाने 'सामना'च्या अग्रलेखात उपस्थित केला आहे. “देशाचा आकार पाहता एकाच नेत्याला सर्व भागांत पोहोचणे अवघड असते. त्यामुळे कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी दोघांत वाटून दिल्याचं शरद पवारांनी सांगितले. हे खरे असेलही, पण राष्ट्रवादी काँगेस पक्षापेक्षा अनेक मोठे पक्ष देशाच्या राजकारणात आहेत. त्यांनाही देश मोठा असल्याने दोन कार्यकारी अध्यक्ष नेमण्याची गरज पडली नाही. मात्र शरद पवार यांनी ते केले. कारण त्यांना पक्षातील जुन्या-नव्यांत समतोल राखावा लागत आहे”, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.