Maharashtra News Update : करोना काळात मुंबई महापालिकेत खिचडी वितरणात झालेल्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने ठाकरे गटातील सूरज चव्हाण यांना अटक केली आहे. तर दुसरीकडे राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या घरीही एसीबीचे छापे पडले आहेत. रत्नागिरीतील त्यांच्या निवासस्थानी एबीसीने तपासकार्य सुरू केले आहे. ठाकरे गटाने जनता न्यायालय आयोजित केल्यानंतर या घडामोडी घडल्याने ठाकरे गट आता पुढील काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. तसंच, २० जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मोर्चासाठी मुंबईत येणार आहेत.त्या पार्श्वभूमीवर सरकार पातळीवरही हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे येत्या एक ते दोन दिवसात सरकार काही महत्त्वाचा निर्णय शक्यता आहे. यासह राज्यातील घडामोडी वाचा.
Maharashtra News Today 18 January 2024 : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा
अयोध्येतील रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने जिल्ह्यात राजकीय पक्षांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून या निमित्ताने आगामी निवडणुकीची तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे.
बुलढाणा : राज्यासह देशातील शेतकऱ्यांना त्रस्त करणारी शेतमाल निर्यातबंदी कायमची बंद करण्यात यावी, या मागणीसाठी शेतकरी संघटना (शरद जोशी) आग्रही आहे. या मागणीकडे केंद्र व राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज, गुरुवारी संघटनेच्या वतीने राज्यभरात धरणे आंदोलन करण्यात आले.
यवतमाळ : प्रेमासाठी वाट्टेल ते करण्याच्या नादात थेट दोन खून करणारा एक प्रेमवीर तब्बल दोन वर्षांनी पोलिसांच्या कचाट्यात सापडला आणि त्याला बेड्या पडल्या. एखाद्या चित्रपटाचे कथानक शोभावे, अशी घटना नेर येथे उघडकीस आली.

सांगली : 'चला जाणूया नदीला' या अभियानाअंतर्गत दुसर्या टप्प्यात कृष्णा नदीसाठी नदी समन्वयक व नदी प्रहरी यांच्या मार्फत दि. २१ ते २८ जानेवारी या कालावधीमध्ये सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीच्या सुरूवातीपासून शेवटपर्यंत कृष्णा नदी संवाद पदयात्रा काढण्यात येणार आहे. तसेच नागरिकांच्यासोबत संवाद साधण्यासाठी विविध गावात बैठकीचेही आयोजन करण्यात आले आहे.
नदी स्वच्छ, अमृत वाहिनी बनविण्यासाठी तसेच नदी संवर्धनासाठी पदयात्रेमध्ये लोकप्रतिनिधी, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, शासकीय अधिकारी, कर्मचारी, कला क्षेत्रातील व्यक्ती, संत व धार्मिक व्यक्ती, शैक्षणिक संस्था या सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृष्णा व तीळगंगा नदी केंद्रस्थ अधिकारी तथा सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी आज येथे केले.
पुणे : सर्व कलांचा संगम घडवणारी अनोखी फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धा यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. या निमित्ताने गेल्या पन्नास वर्षांत फिरोदिया करंडक स्पर्धेत सहभागी झालेल्या कलाकारांचा मेळावा, स्पर्धेच्या वाटचालीचा आढावा घेणारा माहितीपट, स्मरणिका असे अनेक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
पिंपरी : करोना काळात उभारलेल्या काळजी केंद्रात एकाही रूग्णावर उपचार न करता सव्वा तीन कोटी रूपयांचे बिल महापालिकेकडून घेणाऱ्या फॉर्च्युन स्पर्श हेल्थ केअर प्रा. लि. कंपनी प्रशासनाला आयुक्त शेखर सिंह यांनी दणका दिला आहे. ही रक्कम 'स्पर्श'कडून वसूल करण्याचे आदेश दिले. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता असताना करोना काळजी केंद्राच्या नावाखाली सव्वा तीन कोटींच्या झालेल्या भ्रष्टाचारावर एक प्रकारे शिक्कामोर्तबच झाले असून न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई झाली आहे.
पिंपरी : बोपखेल व खडकीला जोडणाऱ्या मुळा नदीवरील शंभर कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेल्या पुलाचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, उच्चदाब विद्युत वाहक तारांच्या एका मनोऱ्याच्या (टॉवर) अडथळ्यामुळे उर्वरित काम पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. मनोऱ्याच्या स्थलांतरासाठी बोपखेल येथील खासगी जागा ताब्यात येत नसल्याने पुलाचे काम रखडले आहे. परिणामी, बोपखेलवासीयांचा मागील नऊ वर्षांपासून सुरू असलेला १५ किलोमीटरचा वळसा अद्यापही सुरूच आहे.
पुणे : मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाचे सर्वेक्षण पुढील चार दिवसांत सुरू करण्यात येणार आहे.
पुण्यातील पूर्व भागात नवीन गृहप्रकल्पांचे प्रमाण वाढत आहे. त्याखालोखाल पश्चिम भागात गृहप्रकल्पांची उभारणी सुरू आहे. पूर्व आणि पश्चिम भागात मिळून सुमारे ७० टक्के गृहप्रकल्प आहेत. दक्षिण आणि उत्तर भागातील गृहप्रकल्पांची संख्या ३० टक्के आहे. मागील वर्षभरात घरांच्या किमतीत १२ ते १५ टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती व्हीटीपी रिॲलिटीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन भंडारी यांनी दिली.
पिंपरी : विविध वाहिन्यांवर प्रसारित होत असलेल्या कीर्तन सोहळ्यात वारकरी सांप्रदायिक आचारसंहिता पाळली जात नाही. साधू, संतांनी परमार्थिक प्रबोधनासाठी सुरू केलेल्या कीर्तन परंपरेच्या विद्रुपीकरणाचे पाप करू नये, असे आवाहन देहूतील जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थांनच्या वतीने राज्यभरातील कीर्तनकारांना करण्यात आले आहे.
पुणे : शहरात सध्या अनेक रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा कमी झाला आहे. वर्षअखेरीच्या सुट्यांमुळे रक्तदान शिबिरांचे प्रमाण घटल्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक रक्तपेढ्यांमध्ये केवळ एक दिवसाचा साठा शिल्लक आहे. पुढील काही दिवसांत रक्तदान शिबिरे पुन्हा सुरू झाल्यास परिस्थिती सुधारण्याची आशा रक्तपेढ्यांना आहे. दरम्यान, काही रक्तपेढ्यांनी पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या जास्त रक्तदानाकडे बोट दाखविले आहे.
पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील अशोकनगर भागात गुरुवारी पहाटे एका ओैषध विक्री दुकानाला आग लागली. आगीत ओैषध विक्री दुकानातील ओैषधांच्या बाटल्यांसह सर्व साहित्य जळाले. दुकान बंद असल्याने सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. आगीची झळ शेजारील दुकानांना बसली.
पुणे : गुंड शरद मोहोळ खून प्रकरणाच्या तांत्रिक तपासात आरोपीने केलेल्या संभाषणाची ऑडिओक्लिप मिळाली आहे. ऑडिओक्लिपच्या माध्यमातून पोलिसांच्या हाती महत्त्वाचा पुरावा आला आहे, अशी माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी बुधवारी न्यायालयात दिली. मोहोळवर गोळ्या झाडणारा आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकरने केलेल्या संभाषणाच्या ऑडिओक्लिपमधून अन्य काही जणांची नावे समोर आली आहेत. त्याअनुषंगाने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
नाशिक: वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे बऱ्याचदा अपघात होतात. या पार्श्वभूमिवर, नाशिक शहर पोलिसांच्या वतीने शहरात सध्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानातंर्गत जनजागृती करण्यात येत आहे.
नागपूर : उद्धव ठाकरे यांच्याहातून शिवसेना पक्ष गेला, असे आम्हाला अजिबात वाटत नाही. राज ठाकरे यांनी पक्ष सोडला, तेव्हाची करणे वेगळी होती आणि ती पुन्हा ऐरणीवर आणायची वेळ आणू नका, असा इशारा शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या व मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला.
वर्तकनगर भागात दहावीत शिकणाऱ्या एका मुलावर चाकूने हल्ला केल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे.
वालजी इस्टेट इमारती समोरील एका अशोकाच्या झाडावर ज्वलनशील रसायनाचा वापर करून संबंधित जिवंत झाड जाळून टाकण्यात आले आहे.
उभ्या महाराष्ट्राचं दुर्दैवं आहे की सकाळ उजाडली की काही चांगली गोष्ट ऐकायला मिळालं असं होतच नाही. कोणाचा तरी बदला घेतलाय, सूड उगवलाय असं काही ऐकायला मिळतं. सूरज चव्हाण चौकशीत सहकार्य करत आहेत. तरीही त्यांना अटक केली गेली. या प्रकरणातील काही आरोपी सरकारमध्ये आहेत. परंतु, त्यांच्यावर कारवाई नाही. एकाला अटक आणि दुसऱ्याला मोकळीक हे कशाचं द्योतक आहे? हा कोणता न्याय आहे? राज्यकर्त्यांची पावलं हुकूमशाहीकडे वळली आहेत. रामराज्याच्या संकल्पनेत संविधान हे आपलं गीता आहे. पण त्याचं उल्लंघन सुरू आहे. सूरज चव्हाण ज्या दिवशी सत्तेच्या बाजूने जातील तेव्हा हसन मुश्रीफांप्रमाणे हसत बाहेर येतील - अरविंद सावंत
अयोध्येत श्रीराम बालस्वरुपात असल्याने त्यांच्या वस्त्राबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. ही उत्सुकता आता संपली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आखलेला डाव आहे. आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो, असे चेन्निथला यांनी म्हटले आहे.
नागपूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रदेश कांग्रेस च्या कार्यकारिणीच्या महाराष्ट्रातील सहा विभागामध्ये काँग्रेसच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पहिली बैठक आज अमरावतीत होत आहे. यासाठी कांग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी बरमेश चेन्निथला आले आहेत.
नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथे राष्ट्रीय युवक महोत्सवात २२ जानेवारीपर्यंत मंदिरांची स्वच्छता करण्याच्या आवाहनानुसार जिल्ह्याच्या ग्रामीण भागातीत प्रमुख मंदिरांची स्वच्छता करण्यात येत आहे. जिल्हा परिषद आणि नाशिक पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने नाशिक तालुक्यातील ओढा येथे मंदिरांची स्वच्छता करण्यात आली.
नागपूर: सरकारी वीज कंपन्यांतील कंत्राटी वीज कामगारांचा सेवेदरम्यान अपघात वा इतर कारणांनी मृत्यू झाल्यास पूर्वी एकही रुपयाची मदत मिळत नव्हती.
नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘प्रिय विद्यार्थी मित्रांना’ अशा मथळ्याखाली नुकतेच पत्र लिहिले आहे. ज्यात चांद्रयान-३ पासून तर विज्ञान, माहिती-तंत्रज्ञान, शेती, डिजिटल रोबोटिक प्रयोगशाळा, कला-वाणिज्य विषयांसह विविध क्षेत्रात पारंगत करणारे शिक्षण शाळांमधून देण्याबाबत सांगितले.
नागपूर : रेल्वेच्या विभागीय रुग्णालयात उपचारादरम्यान एका कर्मचाऱ्याचा मृत्यू, त्यानंतर कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन आणि काही तास ठप्प झालेले रेल्वेगाड्यांचे संचालन, याचा फटका मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक तुषारकांत पांडे यांना बसला. नागपुरातील कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची उचलबांगडी करण्यात आली.
बुलढाणा: शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी १९ जानेवारीला रेल्वे रोकोची घोषणा करणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर हे भूमिगत झाले! त्यामुळे रविकांत तुपकर यांना ताब्यात घेण्याचे पोलिसांचे संभाव्य मनसुबे उधळल्या गेले असून सध्या रविकांत तुपकर यांच्या निवासस्थानी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
नाशिक : स्मार्ट सिटी योजनेतंर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, मल वाहिका आणि पावसाळी गटारींची कामे केली जाणार असल्याने पंचवटीतील सेवाकुंज ते गजानन चौक आणि नाशिक अमरधाम ते शिवाजी चौक दरम्यानचा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे.
मालेगाव : पंधरा वर्षांपूर्वी महापालिका प्रशासनाने वाहनतळांसाठी प्रस्तावित केलेल्या जागा खासगी व्यक्तींनी केलेल्या अतिक्रमणांच्या विळख्यात सापडल्याची तक्रार येथील सार्वजनिक नागरी सुविधा समितीतर्फे करण्यात आली आहे.
मुंबई : राज्य सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत धारावीतील अपात्र रहिवाशांना भाडेतत्त्वावरील घरे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार धारावीतील साडेतीन ते चार लाख अपात्र रहिवाशांना मुलुंडमध्ये घरे देण्यासाठी धारावी पुनर्वसन प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडने (डीआरपीपीएल) मुंबई महानगरपालिकेकडे जागेची मागणी केली आहे.
पालघर: वाढवण बंदराच्या जन सुनावणीच्या बंदोबस्तासाठी पालघर कडे येताना मोखाडा घाटात जळगाव पोलीस यांची गाडी उलटली असून चार अंमलदार जखमी झाले आहेत.१९ जानेवारी (उद्या) पालघर येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या आवारात पर्यावरण विषयी पर्यावरणीय जन सुनावणी आयोजित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र लाईव्ह ब्लॉग
Maharashtra News Live Today 18 January 2024 : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा