Maharashtra Politics Top 5 News : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील कोरेगाव पार्क येथील १८०० कोटींची जमीन ३०० कोटींना खरेदी करण्यात आल्याचे प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात राज्यातील विरोधकांकडून विविध आरोप केले जात आहेत. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी देखील या प्रकरणात प्रतिक्रिया दिली आहे.

१) पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रकरणात राहुल गांधींची एंट्री; नेमकं काय म्हणाले?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे पुण्यातील कोरेगाव पार्क येथील ४० एकर जमीन खरेदी प्रकरणामुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. कारण १८०० कोटींची जमीन केवळ ३०० कोटींना खरेदी करून फक्त ५०० रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे. या प्रकरणात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्रात दलितांसाठी राखीव असलेली १८०० कोटी रुपयांची सरकारी जमीन एका मंत्र्यांच्या मुलाच्या कंपनीला फक्त ३०० कोटी रुपयांना विकण्यात आली. तसेच त्यावरील मुद्रांक शुल्कही माफ करण्यात आलं, म्हणजे ही एक लूट आहे आणि नंतर कायदेशीर सूट. म्हणजे ‘मत चोरी’करून स्थापन झालेल्या सरकारची ही ‘जमीन चोरी’ आहे”, अशा शब्दांत राहुल गांधींनी टीका केली आहे.

“त्यांना माहिती आहे की कितीही लुटलं तरी मत चोरी करून पुन्हा ते सत्तेत परतणार आहेत. त्यांना ना लोकशाहीची काळजी आहे? ना लोकांची? ना दलितांच्या हक्कांची? तुम्हाला लोकशाहीची, जनतेची, दलितांच्या हक्कांची पर्वा नाही. मोदीजी तुम्ही यावर गप्प का आहात? कारण तुमतं सरकार दलित आणि वंचितांचे हक्क हिसकावून घेणाऱ्या त्याच लुटारूंवरच टिकलं आहे”, अशा शब्दांत राहुल गांधींनी पार्थ पवार जमीन प्रकरणावरून थेट मोदींवर टीका केली आहे.

२) “त्या जमिनीची फाईल माझ्याकडे…”, पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणाबद्दल खडसेंचं मोठं विधान

पुण्यातील कोरेगाव पार्क येथील एका जमीन खरेदी प्रकरणामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे चांगलेच अडचणीत आले आहेत. या प्रकरणाबाबत आता आमदार एकनाथ खडसे यांनी एक मोठं विधान केलं आहे. “कोरेगाव पार्कातील त्या जमिनीची फाईल पूर्वी माझ्याकडे आली होती. त्यामध्ये त्या जमिनीच्या विक्रीसाठी परवानगी देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर ती फाईल मी तपासली असता माझ्या लक्षात आलं की, त्याही आधी बाळासाहेब थोरात महसूलमंत्री असताना २०१३ मध्ये त्यांच्याकडे देखील तीच फाईल आलेली होती. तेव्हा बाळासाहेब थोरातांनी ही फाईल नाकारली होती,” असा खुलासा खडसेंनी केला आहे.

“तेव्हा हे लोक उच्च न्यायालयात गेले होते. उच्च न्यायालयानेही जमिनीच्या विक्रीबाबत परवानगी दिली नव्हती. त्यानंतर अनेकांच्या माध्यमातून मला संपर्क करत माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण मी ती फाईल नाकारली होती”, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

“सरकारी जमीन खरेदी करणं हा फौजदारी गुन्हा आहे. तसेच ज्यांनी-ज्यांनी या व्यवहारात मदत केली, मग त्यामध्ये काही अधिकारी असतील, खरं तर हा संगनमताने केलेला व्यवहार, म्हणजे संगनमताने केलेला गुन्हा आहे. त्यामुळे या प्रकरणात कठोर कारवाई झाली पाहिजे”, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

३) “माझ्या हत्येच्या कटामागे धनंजय मुंडे”, मनोज जरांगे पाटील यांचे गंभीर आरोप

मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या हत्येचा कट माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी रचल्याचा आरोप केला आहे. जरांगे पाटील म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांची चौकशी करावी. कारण आरोपींसोबत त्यांच्या बैठका झाल्या आहेत. धनंजय मुंडे यांनी खून करण्याचा आणि घातपात करण्याचा कट रचला आहे. बीड आणि जालना जिल्ह्यातील सर्व प्रतिष्ठित नेत्यांनी ही गोष्ट त्यांच्या कानाने ऐकली आहे. त्यामुळे तुम्ही पक्षातील लोकांना विचारून घ्या की जरांगे पाटील सांगत होते ते खरे आहे का? मला ही गोष्ट कळाली. त्यानंतर याबाबतची माहिती मी पोलीस प्रशासनाला दिली. कारण मुख्य सूत्रधारच धनंजय मुंडे आहेत. ज्यांच्या जीवाला धोका आहे, त्यांना सरकारने संरक्षण देणे गरजेचे आहे.”

धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करताना जरागे-पाटील पुढे म्हणाले की, “मराठा समाजाने शांत रहावे. माझ्या गाडीचा अपघात करत मला ठार मारण्याचा प्रयत्न होता. बीडचा कांचन नावाचा माणूस आहे, तो धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे. त्यांनीच माझ्या विरोधात हे षडयंत्र रचण्याचे काम केले आहे. मराठा समाजाच्या नेत्यांनी हा विषय गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. अशा वृत्तीचा आपल्याला नाय नाट करावा लागेल. आरक्षण, राजकारण हा विषय वेगळा आहे. पण जीवावर उठणे हा विषय खूप गंभीर आहे.”

४) “मूळ व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न सुरू”, पुण्यातील जमीन व्यवहार खरेदी प्रकरणात वडेट्टीवारांचा खळबळजनक आरोप

पुण्यातील कोरेगाव पार्क येथील १८०० कोटींची जमीन ३०० कोटींना खरेदी आणि केवळ ५०० रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात तीन जणांवर गुन्हा दाखल झाला. पण पार्थ पवार यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही, यावरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आणखी गंभीर आरोप केले आहेत. “पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील हे पार्टनर आहेत. मात्र, असं असताना जे गुन्हे दाखल झाले आहेत, त्यामध्ये दिग्विजय पाटील, एक सब-रजिस्ट्रार आणि शीतल तेजवानी यांच्यावर झाले आहेत. यातील मूळ व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणात पार्थ पवारांना सरकारचा आर्शीवाद असून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आमचा आरोप आहे”, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

५) पार्थ पवार प्रकरणावर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया चर्चेत; म्हणाले, “हा घोटाळा खरा असेल तर…”

कोरेगाव पार्क येथील जमिनीच्या व्यवहाराबाबत होत असलेले आरोप याबद्दल शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “या प्रकरणात दोन गोष्टी आहेत. एक मी ऐकले की, यामध्ये कोणत्यातरी रजिस्ट्रारला निलंबित करण्यात आले आहे. जर ऐवढी मोठी गोष्ट असेल, हा घोटाळा खरा असेल तर या एका निलंबनाने हा विषय संपणार आहे का? आणि दुसरी गोष्ट अशी की, भाजपाच्या मित्रपक्षांना आता कळले असेल की, ते जवळ तर घेतात पण बदनाम करून सोडतात.”