Maharashtra Politics Top 5 Political statements : राज्यात आगामी महापालिका निवडणुकांसाठीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मोर्चे बांधणीला सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. याबाबत आज संजय राऊतांनी मोठे संकेत दिले आहेत. तसेच मनसे नेत्यानेही ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत मनसे-शिवसेनेच्या युतीबाबत महत्वाचं विधान केलं आहे. दुसरीकडे वडेट्टीवार यांनी आपण भुजबळांच्या पाया पडायलाही तयार असल्याचं म्हटलं आहे, तर दुसरीकडे अजित पवारांनी बारामतीत बोलताना तुफान फटकेबाजी केली आहे. तसेच राज्यातील बोगस व दुबार मतदारांबाबत भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात आज कोणत्या नेत्यांनी नेमकं काय म्हटलं? त्यापैकी आज दिवसभरातील पाच महत्वाची राजकीय विधाने काय आहेत? ते जाणून घेऊयात.

‘राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती पक्की’ : संजय राऊत

शिवसेनेचे (उबाठा) राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आज एक मोठं विधान केलं. “दोन ठाकरे बंधूंची (उद्धव ठाकरे व राज ठाकरे) युती पक्की आहे”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच ज्यांना सोबत यायचं आहे त्यांचं आम्ही स्वागत करू असंही राऊत म्हणाले आहेत. “राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. त्यामुळे ज्यांना आमच्यासोबत यायचं असेल त्यांचं आम्ही स्वागत करू. ही युती पक्की आहे. मी महाविकास आघाडी बद्दल देखील वारंवार सांगत आलो आहे. जे सोबत येतील त्यांना आम्ही घेऊन पुढे जाऊ”, असं राऊतांनी म्हटलं आहे.

“…तर भुजबळांच्या पाया पडेन”: वडेट्टीवार

नागपूरमध्ये पार पडलेला ओबीसी मोर्चा यशस्वी ठरल्यानंतर भाजपाने मला लक्ष्य करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. छगन भुजबळ हे महायुती सरकारमधील मंत्री असून, बीडमध्ये झालेल्या सभेत त्यांनी माझ्यावर केलेली टीका त्याचाच एक भाग आहे,” अशी टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत केली. वडेट्टीवार म्हणाले, “छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या विरोधात आम्ही कधीच भाष्य केलं नाही. मात्र आधी मनोज जरांगे पाटील आणि आता भुजबळ साहेब, दोघांनीही मला टार्गेट केलं. जर माझ्यावर टीका करून समाजाचे प्रश्न सुटत असतील, तर मला त्याचा आनंद आहे. जर खरंच २ सप्टेंबरचा ओबीसीविरोधी शासन निर्णय रद्द होणार असेल, तर मी छगन भुजबळ यांच्या पाया पडायला तयार आहे. त्यानंतर मी त्यांच्या नेतृत्वाखाली ओबीसींसाठी पुढे काम करायला तयार आहे.”

“त्यांनी राजकारणात येऊ नका…”, अजित पवारांचा सल्ला

उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचं उद्घाटन पार पडलं. यावेळी अजित पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना तुफान फटकेबाजी केली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारी आणि त्यावर अजित पवारांनी दिलेल्या उत्तरानंतर कार्यक्रमात एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं. यावेळी अजित पवारांनी कॉन्ट्रॅक्टरांना एक सल्लाही दिला. ते म्हणाले की, “ज्यांना कॉन्ट्रॅक्टर बनायचंय त्यांनी राजकारणात येऊ नका. आमची देखील पंचायत होते. कारण चांगलं काम झालं नाही तर आम्ही फडाफड बोलतो. कारण त्या कामांना आम्ही निधी दिलेला असतो. आम्हाला निधीच्या पै आणि पैचा हिशेब लागतो.”

‘अधिकारीच पैसे घेतात’, भाजपा आमदाराचा गौप्यस्फोट

राज्यातील बोगस व दुबार मतदारांमुळे राजकारण तापलेलं असताना बेलापूरच्या भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांनी त्यांच्या मताशी शंभर टक्के सहमती दर्शवली. मंदा म्हात्रे म्हणाल्या, “मी २००४,२००९ आणि २०१४ या तीनही निवडणुकांमध्ये बेलापूरमधून लढले. प्रत्येक वेळी निवडणुकीपूर्वीच अधिकाऱ्यांकडे बोगस आणि दुबार नावांची यादी सादर केली होती. पण त्यावर कारवाई होत नाही. अनेक वेळा कलेक्टर, निवडणूक अधिकारी, बीएलओ यांना सांगूनही तीच नावं यादीत पुन्हा दिसतात. जवळपास २० ते २२ हजार अशा नावांचा मी स्वतः सर्वेक्षण करून शोध घेतला आणि त्याची माहिती कलेक्टर तसेच संबंधित अधिकाऱ्यांना दिली. पण ती नावं यादीतून वगळली गेली नाहीत. या बोगस नावांमुळे सकाळच्या सत्रात बोगस मतदान होतं आणि प्रामाणिक उमेदवारांना त्याचा फटका बसतो. निवडणुकीत हार-जीत हा प्रश्न नंतरचा असतो, पण बोगस मतदान हे लोकशाहीचा अपमान आहे. मी हे वारंवार अधिकाऱ्यांना सांगत आले. काही ठिकाणी अधिकारी सुद्धा या नावांच्या नोंदणीत सामील असतात आणि अनेकदा या व्यवहारात पैशांची देवाणघेवाणही होत असल्याचं दिसते”, असे त्या म्हणाल्या.

ठाण्यात मनसे-शिवसेना (ठाकरे) एकत्र? अविनाश जाधवांचं सूचक भाष्य

मनसे नेते अविनाश जाधव यांनी आज एक सूचक वक्तव्य केलं. दोन्ही पक्षांनी ठाण्यात एकत्र काम सुरू केलं असल्याचं जाधव यांनी सांगितलं. ते म्हणाले, “स्थानिकांच्या प्रश्नांसाठी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते सातत्याने रस्त्यावर उतरलेले दिसतील. निवडणुका एकत्र लढण्याबाबत राज ठाकरे ठरवतील. शिवसेना (उबाठा) व आम्ही (मनसे) एकत्र काम सुरू केलं आहे. ठाणे महानगरपालिकेत आमची मोर्चेबंधणी चालू आहे. शिवसैनिक व महाराष्ट्र सैनिकांनी एकत्र येत ठाण्यात अलीकडेच एक मोर्चा काढला होता. त्या मोर्चाला देखील मोठ्या प्रमाणात यश मिळालं. लोकांचा पाठिंबा मिळाला. आम्ही मनपा अधिकाऱ्याच्या बदलीची मागणी केली होती. सरकारला आमच्यासमोर झुकावं लागलं आणि त्या अधिकाऱ्याची बदली करावी लागली. अशाच प्रकारे लोकहिताच्या कामांसाठी शिवसैनिक व महाराष्ट्र सैनिक तुम्हाला रस्त्यावर एकत्र दिसतील.”