Maharashtra Politics Todays Top 5 Stories: येत्या काही दिवसांत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे फैरी झडत आहेत. आज दिवसभरात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे, कार्यकर्त्यांचे मोबाईल टॅप केले जात असल्याचे वक्तव्य चर्चेत आहे. यावर ठाकरे गटाने बावनकुळेंना अटक करण्याची मागणी केली आहे. याचबरोबर रोहित पवार यांनी भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी करण्यासाठी ऑडिटची गरज नसल्याचे म्हटले आहे. तसेच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर माजी आमदार रवींद्र धंगेकर सातत्याने आरोप करत आहेत. यासह राज्यातील चर्चेतील राजकीय वक्तव्यांचा आढावा घेऊया.

सर्वांचे मोबाईल व व्हॉट्सअ‍ॅप सर्वेलन्सवर टाकले आहेत: चंद्रशेखर बावनकुळे

“सर्वांचे मोबाईल व व्हॉट्सअ‍ॅप सर्वेलन्सवर टाकले आहेत”, असे खळबळजनक वक्तव्य राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. “कार्यकर्त्यांचे मोबाईल व भंडाऱ्यातील व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्स सर्वेलन्सवर टाकले आहेत”, असेही ते म्हणाले. “तुमचं मोबाईलवरील एक चुकीचे बटण पुढच्या पाच वर्षांचा सत्यानाश करेल. निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्याच्या रागात एखादा कार्यकर्ता, पदाधिकारी तमाशा करतो, मात्र, आता कार्यकर्त्याने बंडखोरी केली तर त्या कार्यकर्त्यांसाठी नेत्यांची दारे बंद होतील”, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

चंद्रशेखर बावनकुळेंना अटक करा: ठाकरे गटाची मागणी

“सर्वांचे मोबाईल व व्हॉट्सअ‍ॅप सर्वेलन्सवर टाकले आहेत”, असे खळबळजनक वक्तव्य राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. यावर ठाकरे गटाने टीका केली आहे. “चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर इंडियन टेलिग्राफ ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करा आणि त्यांची चौकशी करा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोणत्या प्रकारचे पेगॅससचे मशीन स्वत: आणलेले आहे का? की भाजपाच्या कार्यालयात लावलेले आहे? किंवा त्यासाठी काही खासगी लोक कामाला लावले आहेत का?”, असे शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

त्या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवणार का? रोहित पवारांचा सवाल

“मंत्र्यांचे ऑडिट होणार असेल तर चांगली गोष्ट आहे. पण मंत्र्यांचे सिडको, रॅपिडो, पत्ते, डान्सबार, हनी ट्रॅप, गुंडांसोबतची सलगी, बिल्डर आणि ठेकेदारांसोबतचे असलेले संबंध आदी ‘पराक्रम’ बघितले तर या ऑडिटमध्ये अनेक मंत्री सरकारची Assets बनण्याऐवजी Liability बनलेत, हे सांगायला खरे तर कुठल्याही ऑडिटरची गरज नाही. तरीही ऑडिट करणारच असाल तर हा ऑडिट रिपोर्ट सार्वजनिक करणार का? आणि ऑडिटमध्ये फेल झालेल्या मंत्र्यांना नैतिक जबाबदारी स्वीकारून घरचा रस्ता दाखवणार का? हेही स्पष्ट झाले पाहिजे”, अशी खोचक टीका रोहित पवारांनी महायुती सरकारवर केली आहे.

महापौर असताना मुरलीधर मोहोळ कोथरूडच्या बिल्डरची गाडी वापरायचे: रवींद्र धंगेकर

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीच्या व्यवहार प्रकरणावरून शिवसेना (एकनाथ शिंदे) नेते रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. “मुरलीधर मोहोळ हे पुणे महापालिकेचे महापौर असताना बिल्डरची गाडी वापरायचे” असा आरोप धंगेकर यांनी केला आहे.

“मुरलीधर मोहोळ खासदार होण्याच्या अगोदर पुण्यनगरीचे महापौर होते. ते महापौर असताना पुणे महानगरपालिकेची अधिकृत शासकीय पाटी लावून महापौर पांढऱ्या रंगाची इनोव्हा क्रिस्टा वापरायचे. त्या गाडीचा नंबर MH 12 SW 0909 होता. ही गाडी ना मोहोळ यांची होती, ना पुणे महानगरपालिकेचे शासकीय वाहन. ही गाडी होती कोथरूडच्या बढेकर बिल्डरची”, असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.

“खोटे आणि बोगस ट्विट करतात”, धंगेकरांच्या आरोपांना मुरलीधर मोहोळ यांचे प्रत्युत्तर

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ पुण्याचे महापौर असताना बिल्डरची गाडी वापरायचे असा आरोप माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला होता. याला प्रत्युत्तर देताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की, “दररोज सकाळी ते (रवींद्र धंगेकर) खोटे आणि बोगस ट्विट करतात. तुम्ही देखील त्या बातम्या चालवता. मी त्यांच्या आरोपावर दोनवेळा स्पष्टीकरण दिले आहे. आज शेवटचे स्पष्टीकरण देतो. मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक गोष्टीचा पुरावा मागा. आता त्यांनी गाडीचा आरोप केला, मी तुम्हाला सांगतो की पुण्यातला पहिला असा मी महापौर आहे की ज्याने स्वत:च्या खर्चाने अडीच वर्ष गाडी वापरली. महापालिकेची गाडी वापरली नाही.”