Maharashtra Politics Todays Top 5 Stories: फलटणच्या जिल्हा उपरुग्णालयात काम करणाऱ्या एका डॉक्टर तरुणीने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी या तरुणीने एक चिठ्ठी आणि हाताच्या तळहातावर आत्महत्येची कारणे लिहिली होती. या प्रकरणी मुख्य आरोपी असलेला फलटणमधील पोलीस उपनिरीक्षक आणि दुसऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत.
या प्रकरणावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) नेते अंबादास दानवे, माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
“सुसंस्कृत समाजाच्या विवेकाला हादरवून टाकणारी घटना”
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावर देशभरातून संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
“बलात्कार आणि छळाला कंटाळून महाराष्ट्रातील साताऱ्यातील फलटण येथील एका डॉक्टर तरुणीने केलेली आत्महत्या ही सुसंस्कृत समाजाच्या विवेकाला हादरवून टाकणारी घटना आहे. इतरांच्या वेदना कमी करण्याची आकांक्षा बाळगणारी एक डॉक्टर मुलगी, भ्रष्ट शक्ती आणि व्यवस्थेतील गुन्हेगारांच्या छळाची बळी ठरली”, असे राहुल गांधींनी म्हटले आहे.
“पत्रात साताऱ्यातील खासदार असा उल्लेख”
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत चुकीचा शवविच्छेदन अहवाल देण्यासाठी वरिष्ठांचा दबाव तसेच खासदारांच्या दोन खासगी सचिवांकडून दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपाचे माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, त्यांचे बंधू अभिजीत निंबाळकर, राष्ट्रवादीचे आमदार सचिन पाटील यांच्यावर आरोप केले आहेत.
अंबादास दानवे यांनी भाजपाचे नेते आणि माजी खासदार रणजित निंबाळकर यांचा उल्लेख करत एक्सवर आरोप केले आहेत. मृत तरूणीने आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात साताऱ्यातील खासदार असा उल्लेख असल्याचे दानवे आणि इतर विरोधकांनी म्हटले आहे.
“मला थोडीशी जरी शंका असती तर…”
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे (ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी भाजपाचे नेते आणि माजी खासदार रणजित निंबाळकर यांच्यावर आरोप केले होते. यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट भाष्य केले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “अलीकडच्या काळात प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवायचे, अशा प्रकारचा निंदनीय प्रयत्न होताना दिसत आहे. कारण नसताना रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील यांची या प्रकरणात नाव घुसविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या महाराष्ट्राला देवाभाऊ माहीत आहे. मला थोडीशी जरी शंका असती तर मी हा कार्यक्रम रद्द केला असता.”
आज फलटणमध्ये विविध विकास कामांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्यावेळी त्यांनी या प्रकरणावर भाष्य केले.
“मलाही दोन मुली आहेत, अशा घाणेरड्या प्रसंगाशी…”
फलटणच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर होत असलेल्या आरोपांवर बोलताना माजी खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर आज फलटणमधील एका कार्यक्रमात म्हणाले की, “दोन दिवसांपूर्वी एका भगिनीचा मृत्यू झाला. त्या भगिनीने हातावर मृत्यूचे कारण लिहून ठेवले आहे. तुम्ही (देवेंद्र फडणवीस) येऊ नये म्हणून गलिच्छ राजकारण झाले. मलाही दोन मुली आहेत. अशा घाणेरड्या प्रसंगाशी जेव्हा नाव जोडले जाते तेव्हा मनाला वेदना होतात.”
काँग्रेसच्या सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आज मयत महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांची भेट घेतली. बीड जिल्ह्यातील त्यांच्या घरी जाऊन त्यांनी ही भेट घेतली आहे. यावेळी प्रणिती शिंदे यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत विचारपूस केली आणि त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी या प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी मी आपल्या सोबत आहे, असा शब्द देखील त्यांनी दिला.
“जेव्हा महिलांना संरक्षण देण्याची वेळ येते तेव्हा…”
यानंतर माध्यमांशी बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या की, “राज्याचे गृहमंत्री अथवा मुख्यमंत्री वारंवार तक्रार करूनसुद्धा महिलांना संरक्षण देण्यापेक्षा महिला खासदारांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यातच वेळ वाया घालवतात. पण जेव्हा महिलांना संरक्षण देण्याची वेळ येते तेव्हा मात्र मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे हात वर करतात, ज्यामुळे त्यांनी महाराष्ट्राची संस्कृतीची पातळी एकदम खालच्या स्तरावर आणली आहे. मला असे वाटते की मुख्यमंत्री- गृहमंत्र्यांनी राजीनामा देणे गरजेचे आहे.”
