सावंतवाडी : महाराष्ट्र: प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध दर्शवत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज सावंतवाडी येथे निर्धार व्यक्त केला. पर्यावरण ऱ्हास, शेतकऱ्यांचे विस्थापन आणि राज्यावर येणारे प्रचंड कर्ज या प्रमुख मुद्द्यांवर भर देत, हा महामार्ग रद्द होईपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला. प्रसंगी मार खाण्याचीही तयारी असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
महामार्ग नव्हे, ‘स्वार्थपीठ’: शेट्टींचा हल्लाबोल; शेट्टी यांनी शक्तीपीठ महामार्गाला ‘स्वार्थपीठ’ संबोधत, महाराष्ट्र शासन या प्रकल्पाद्वारे राज्याला कर्जाच्या खाईत लोटत असल्याचा आरोप केला. ८६ हजार कोटी रुपयांचा अंदाजित खर्च दीड लाख कोटींपर्यंत पोहोचण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. “पुणे-बंगळूर आठ पदरी ग्रीनफिल्ड महामार्ग ७०० किलोमीटरसाठी ५० हजार कोटींमध्ये होत असताना, ८०२ किलोमीटरचा सहा पदरी शक्तीपीठ महामार्ग ८६ हजार कोटींना का?” असा सवाल उपस्थित करत, यामागे ५० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा वास येत असल्याचा गंभीर आरोप शेट्टी यांनी केला. देवाधर्माच्या नावाखाली जनतेच्या खिशातून पैसे काढण्याचा हा प्रयत्न असल्याचा त्यांचा दावा आहे.
राजकीय नव्हे, भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांचा लढा;शेट्टी यांनी स्पष्ट केले की, शक्तीपीठ महामार्गाविरोधातील हा लढा कोणताही राजकीय नाही, तर भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी आहे. पर्यावरण वाचवणे, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेला महापुरापासून वाचवणे आणि शेतकऱ्यांच्या जमिनी सुरक्षित ठेवणे हे या लढ्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.
सिंधुदुर्गच्या साथीनं किंवा साथीशिवायही लढा सुरूच:सिंधुदुर्गातून या महामार्गाला विरोध करणाऱ्यांना धमक्या दिल्या जात असल्या तरी, जर यामुळे महामार्ग रद्द होत असेल तर मार खाण्याचीही आपली तयारी असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्या महामार्ग बदलाच्या दाव्यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “जर मार्ग बदलला तरी डोंगर पोखरून बोगदे मारल्यास नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटणार नाहीत का?” असा सवाल त्यांनी विचारला. सिंधुदुर्ग जिल्ह्याने साथ दिली नाही तरी हा महामार्ग रद्द झाल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. डॉ. जयेंद्र परुळेकर यांनीही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या महामार्गाला विरोध असल्याचे सांगितले.
स्थानिक विकासाचा दावा फोल, उद्योगांसाठीचा मार्ग? शक्तीपीठ महामार्गामुळे स्थानिकांचा विकास होईल, हे गोड स्वप्न शासनाकडून दाखवले जात असले तरी, समुद्री एक्सप्रेसवेच्या दुतर्फा बॅरिकेट्स आणि दुचाकींना प्रवेशबंदी यामुळे स्थानिकांचा विकास कसा होईल, असा प्रश्न शेट्टी यांनी विचारला. “मुंबई-गोवा महामार्ग अर्धवट असताना शक्तीपीठ महामार्गावर शक्ती का लावली जात आहे?” असा सवालही त्यांनी केला. गडचिरोली येथील एका मोठ्या उद्योग समूहाच्या मायनिंग प्रकल्पातील खाजगी बंदरातून निर्यात सुलभ करण्यासाठीच हा महामार्ग प्रस्तावित असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
या पत्रकार परिषदेला शेट्टी यांच्यासोबत ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक, कॉम्रेड संपत देसाई, ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, सतीश सावंत, डॉ. जयेंद्र परुळेकर, संदेश पारकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, कोल्हापूर चे संग्राम कुपेकर,ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, चंद्रकांत कासार, संदीप सावंत, माजी सभापती रमेश गावकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गुडेनवर, प्रांतिक सदस्य संग्राम कुपेकर, कोल्हापूर जिल्ह्याचे ठाकरे सेना जिल्हाप्रमुख नागेश चौगुले, मनसेचे जिल्हाप्रमुख विद्याधर गुटवे, काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. मळवीकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.