सातारा : महाबळेश्वर, पाचगणी पर्यटन महोत्सवावेळी प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आलेल्या महाराष्ट्र पर्यटक सुरक्षा दलाचा प्रयोग यशस्वी झाल्याने त्याचा अवलंब आता मुंबईतील पर्यटन स्थळांवर केला जाणार आहे. मलबार हिलसह अन्य पर्यटन स्थळांवर लवकरच अशी दले सक्रिय होणार असल्याची माहिती राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी साताऱ्यातील पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे आदी अधिकारी या वेळी उपस्थित होते.

देसाई म्हणाले, की या वर्षी महाबळेश्वरमध्ये पर्यटन महोत्सवाचे आयोजन केले होते. या वेळी पर्यटकांच्या संभाव्य गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी राज्यात प्रथमच महाबळेश्वर आणि पाचगणी येथे महाराष्ट्र पर्यटक सुरक्षा दलाचा प्रयोग राबविण्यात आला होता. ही पर्यटक सुरक्षा दले अद्याप कार्यरत आहेत. या दलांमुळे महाबळेश्वर आणि पाचगणी या दोन्हीही ठिकाणच्या पर्यटकांच्या संख्येत मागील तीन महिन्यांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. या दलांमुळे पर्यटकांमध्ये अशा ठिकाणी फिरताना सुरक्षिततेची भावना तयार होत असून, त्यामुळे त्यांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.

महाबळेश्वर आणि पाचगणी येथील हा प्रयोग यशस्वी झाल्याने त्याचा अवलंब आता मुंबईतील पर्यटन स्थळांवर केला जाणार आहे. मलबार हिल, पाली हिलसह मरिन ड्राइव्ह समुद्रकिनाऱ्यासह मुंबईतील अन्य पर्यटन स्थळांवर ही दले कार्यरत राहतील. या दलामध्ये निवड झालेल्या तरुणांना पोलिसांच्या मदतीने विशेष प्रशिक्षण देण्यात येते. पर्यटन स्थळावरील सुरक्षितता, स्थानिक वारसा आणि कायद्याची माहितीही त्यांना दिली जाते. याशिवाय पर्यटनस्थळांवर पर्यटकांची काळजी घेणे, आपत्कालीन स्थितीमध्ये कृती करणे आदी बाबींचे प्रशिक्षण त्यांना दिले जाते, असे देसाई म्हणाले.

यातून अनेक होतकरू तरुणांना रोजगार मिळतो, तर पर्यटनस्थळांवर येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षा मिळते. पर्यटकांमध्ये अशा ठिकाणी फिरताना सुरक्षिततेची भावना तयार होत असल्यामुळे त्यांचा या स्थळावर येण्याचा कल वाढत असल्याचे लक्षात आले आहे. पर्यटक या स्थळांवर पुन:पुन्हा येतात, मुक्काम करतात. या प्रयोगामुळे महाबळेश्वर आणि पाचगणी या दोन्हीही ठिकाणच्या पर्यटकांच्या संख्येत मागील तीन महिन्यांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले असल्याचेही देसाई यांनी सांगितले.