गाव पातळीवरील दाखल असणारे व नव्याने निर्माण होणारे तंटे सामोपचाराने मिटविण्याच्या उद्देशाने राबविल्या जाणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत गेल्या पाच वर्षांत राज्यातील १,२२३ गावे अंतिम मूल्यमापनात १९०पेक्षा अधिक गुण मिळवून शांतता पुरस्कारासाठी पात्र ठरली आहेत. मोहिमेच्या तिसऱ्या वर्षी हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या गावांची संख्या सर्वाधिक म्हणजे ३६० इतकी होती. पाचव्या वर्षांत हे प्रमाण ७५ गावांपर्यंत खाली घसरले आहे.
या मोहिमेंतर्गत १९० पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या गावांना त्यांना मिळणाऱ्या पुरस्काराशिवाय मिळालेल्या पुरस्कार रकमेच्या २५ टक्के इतकी रक्कम विशिष्ट सन्मानचिन्हासह शांतता पुरस्कार म्हणून दिली जाते. गाव विकास प्रक्रियेत अडसर ठरलेले तंटे सोडवून विकासाचा मार्ग सुकर करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने २००७ पासून राबविलेल्या या योजनेमुळे ग्रामीण भागातील तंटे-बखेडय़ांचे प्रमाण कमी करण्यात यश येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. चार वर्षांत संपूर्ण राज्यात सामोपचाराने मिटविले गेलेले तब्बल नऊ लाख तंटे हे त्याचे निदर्शक आहेत. गावासाठी गावातच लोकसहभागातून तात्काळ व सर्वसामान्य तडजोड घडवून आणण्यासाठी व्यवस्था निर्माण करणे हा योजनेचा उद्देश आहे. या मोहिमेत तंटामुक्त गाव जाहीर करण्यासाठी शासनाने काही विशिष्ट निकष निश्चित केले आहेत. त्या अंतर्गत तंटामुक्त गाव पात्रतेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, दाखल तंटे मिटविणे व नव्याने होणारे तंटे मिटविणे यासाठी एकत्रित १५० गुणांची आवश्यकता असते. बाह्य मूल्यमापनात पात्र ठरलेल्या गावांना तंटामुक्त गाव म्हणून जाहीर केले जाते. या मूल्यमापन प्रक्रियेत ज्या गावांनी १९० हून अधिक गुण प्राप्त केले, त्यांची शांतता पुरस्कारासाठी निवड केली जाते. या गावांना मिळणाऱ्या पुरस्काराशिवाय मिळालेल्या पुरस्कार रकमेच्या २५ टक्के इतकी रक्कम विशिष्ट सन्मानचिन्हासह शांतता पुरस्कार म्हणून दिली जाते. या मोहिमेचा मागील पाच वर्षांचा आढावा घेतल्यास राज्यात १,२२३ गावे १९० हून अधिक गुण प्राप्त करून शांतता पुरस्कारासाठी निवडले गेले. ज्या वर्षी या मोहिमेचा शुभारंभ झाला, त्या २००७-०८ या पहिल्या वर्षांत २५२ गावांची या पुरस्कारासाठी निवड झाली होती. त्यापुढील २००८-०९ या वर्षांत २६५ गावे, २००९-१० या कालावधीत हा पुरस्कार मिळविणाऱ्या गावांची संख्या सर्वाधिक म्हणजे ३६० इतकी होती. २०१०-११ मध्ये राज्यातील २७१ गावांनी शांतता पुरस्कार मिळविला. मोहिमेच्या पाचव्या अर्थात २०११-१२ या वर्षांत गावांची संख्या सर्वात कमी म्हणजे केवळ ७५ गावांवर आली आहे. या माध्यमातून उपरोक्त गावांना स्थायी स्वरूपाची विकासकामे करण्यासाठी पारितोषिकांच्या माध्यमातून जादा निधी प्राप्त झाला.